no images were found
स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने यांना एनआयटी कोल्हापूर यांचे अभिवादन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-ब्रिटिशांना सळो की पळो करणारे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी कोल्हापूरचे माजी खासदार शंकरराव माने यांना एनआयटी कोल्हापूरने स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिवादन केले. एनआयटी कोल्हापूरचे संचालक डाॅ. संजय दाभोळे, रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, विभागप्रमुख प्रा. सुभाष यादव, प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. दिपक जगताप, प्रा. विक्रम गवळी, प्रा. सुहासचंद्र देशमुख, प्रा. बाजीराव राजिगरे आणि जगदीश इंगवले यांनी सर्व एनआयटी कोल्हापूर परिवारातर्फे दिवंगत स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने व त्यांच्या पत्नी दिवंगत स्वातंत्र्यसेनानी शकुंतलाताई माने यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांचे चिरंजीव आनंद माने आणि सर्व कुटुंबिय उपस्थित होते. डाॅ. संजय दाभोळे यांनी पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व मातृसंस्थेचा इतिहास ग्रंथ ‘बहुजन पर्व’ भेट देवून माने कुटुंबियांचा सत्कार केला. यावेळी स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने यांनी स्वातंत्र्यलढ्यात गाजवलेले धाडसी पराक्रम ज्यामध्ये जेजुरी तसेच मिरज-बार्शी रेल्वेमधील ब्रिटिशांचा खजिना लुटणे, आत्ताच्या शिवाजी चौकातील तत्कालीन ब्रिटिश गवर्नर लाॅर्ड विल्सनचा पुतळा फोडणे, शालिनी पॅलेसवरील दरोडा, बातमीपत्र छापून भूमिगत सेनानींपर्यंत वितरण आदी त्यांच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा मिळाला. १९४२ ला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ असा आदेश दिला. त्यांनी पुकारलेल्या या आंदोलनास प्रतिसाद देत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, भाई माधवराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिगत राहून आमच्या वडिलांनी चळवळीचे नेतृत्व केले व पराक्रम गाजवला, अशी माहिती देत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना आनंद माने व कुटुंबियांनी व्यक्त केली. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ब्रिटिश गवर्नर लाॅर्ड विल्सनच्या फोडलेल्या पुतळ्याचे भग्नावशेष आनंद माने यांनी उपस्थितांना दाखवताच सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचे चरित्र आत्ताच्या पिढीला माहिती करून देत त्यांच्यात देशभक्ती रूजवणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन डाॅ. संजय दाभोळे यांनी केले. यावेळी शंकरराव माने यांचे चिरंजीव आनंद माने, नातू माजी उपमहापौर अर्जुन माने, सुहास सासणे, सुकन्या, नात, पणती असे माने परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.