no images were found
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण
मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्यद्वाराजवळ ७५ फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण करण्यात आले. संजय गांधी नॅशनल पार्कच्या विकासासाठी सरकारद्वारे २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून उद्यानातील वनराणी ही मिनी ट्रेन लवकरच सुरू करणार, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे,आमदार मनिषा चौधरी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक तथा वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक रेवती पाटील यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, नॅशनल पार्कच्या मुख्य द्वाराजवळ या ठिकाणी उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज हा मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. या ठिकाणी रोज ७.३० वाजता नागरिकांना झेंडावंदनाचा आणि राष्ट्रगीताचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे. हा ध्वज राष्ट्रप्रेमाची, बलिदानाची आठवण करून देणार आहे. आज आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले म्हणून आपल्याला राष्ट्रध्वज फडकविण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशात लोकशाही आली, आपल्या देशासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी मी नागरिकांना विनंती करतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासासाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकहिताची कामे करण्यास प्राधान्य द्यावे, या दिलेल्या मार्गदर्शनानुसार शासन काम करत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी सरकारद्वारे २५ कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास, मुख्यद्वाराचे आणि आतमधील इमारतीचे नूतनीकरण, पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत., असेही त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विकास विभागाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथ व्हॅनचे व तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील वाहनांसाठीच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले.