no images were found
जिल्ह्यातील सर्व विभागांनी मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत – अमोल येडगे
कोल्हापूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत युवकांना 6 महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन देवून या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या महास्वयं पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून विद्या वेतनासह शासकीय कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र युवकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल भिंगारे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, कौशल्य विकास अधिकारी संगिता खंदारे तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते. या बैठकीनंतर पुणे महसुल विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या समवेत दूरदृष्टी प्रणाली द्वारे बैठक घेऊन या योजनेच्या अंमलबजावणी बाबत आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, या योजनेसाठी अद्याप पदांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर केली नसलेल्या शासकीय आस्थापनांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. आपल्या कार्यालयाच्या मंजूर आकृतीबंधाच्या 5 टक्के प्रशिक्षणार्थी 6 महिन्यांसाठी या प्रक्रियेद्वारे शासकीय कामकाजासाठी उपलब्ध करुन घ्यावेत. यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पदे नोंदवावीत. तसेच या आठवड्याभरात प्रशिक्षणार्थींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करुन प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयात रुजू करुन घ्यावे. या योजनेमुळे शासकीय आस्थापनांना शासकीय कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील युवकांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन घेवून शासकीय कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे सर्व आस्थापनांनी ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य द्यावे.
जिल्ह्यात शासकीय कार्यालयाकडील 1 हजार 154 पदे आतापर्यंत पोर्टलवर नोंदवण्यात आली असून या पदांसाठी 901 युवकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यापैकी 27 उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे. तर खाजगी क्षेत्रासाठी दहा उमेदवारांची निवड झाली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी बैठकीत दिली.