
no images were found
देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते तातडीने ठेकेदारामार्फत दुरुस्ती करुन घ्या – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. शहरातील रस्त्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी येत असलेने आयुक्त कार्यालयात आज सकाळी रस्ते दुरुस्तीबाबत शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची आढावा बैठक प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतली.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरामध्ये मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत ते तातडीने विभागीय कार्यालयाअंतर्गत मुजविण्यात यावेत. गणेश उत्सवापुर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत याची सर्व जबाबदारी शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची राहील. वॉरंन्टी कालावधीमधील तीन वर्षाच्या आतील जे 400 रस्ते आहेत त्याची तपासणी करुन शासन निर्णय प्रमाणे ते दुरुस्त करुन घ्यावेत. त्या रस्त्यावर संबंधीत ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्ती करुन घेऊन सर्व रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. संबंधीत ठेकेदाराने जर दुरुस्तीची कामे व्यवस्थीत केली नाहीत तर त्याच्यावर कारवाई करुन पुढील कोणतेही नविन काम देण्यात येऊ नये. शहरातील इतर रस्ते विभागीय कार्यालयामार्फत तातडीने दुरुस्ती करुन सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना यावेळी संबंधीत उपशहर अभियंता यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी उपस्थित होते.