no images were found
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल रमेश बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांचा आज 30 जुलै रोजी कार्यकाळ पूर्ण झाला. महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे शुभेच्छांसह निरोप देण्यात आला.
राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल श्री. बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
आपल्या कार्यकाळात राज्य शासनाकडून उत्तम सहकार्य मिळाल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांचे वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांना राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असलेले पुस्तक भेट दिले.
निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल श्री. बैस यांनी त्यानंतर रायपूरकडे प्रस्थान केले.
नव्या राज्यपालांचा शपथविधी 31 रोजी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले नवे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे बुधवार 31 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6. 30 वाजता होणार आहे.