no images were found
पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला दुसरे कांस्यपदक क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघांनी अचूक लक्ष्यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे मनू भाकरचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. देशवासीयांना त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी काढले.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात देशाला दुसरे ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून दिले, त्याबद्दल मंत्री श्री. बनसोडे यांनी अभिनंदन केले. तसेच भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिंकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केला.