no images were found
गोव्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मोलबायो आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस यांच्यात सामंजस्य करार
पणजी : मोलबायो डायग्नोस्टिक्स प्रा. लि. आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस आणि गोवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅथॉरिटीने गोवा राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा आणि सुधारणा करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या मुख्यालयात २६ जुलै ला एका औपचारिक स्वाक्षरी समारंभात डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस चे संचालिका डॉ. रुपा नाईक, सीएसआर विभागाचे संयुक्त सीईओ विजय सक्सेना आणि मोलबायोचे वित्तीय नियंत्रक संदीप खरे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी गोव्याचे माननीय आरोग्य ओएसडी मंत्री डॉ. राजनंदा देसाई, आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या सीएसआर विभागाचे नोडल अधिकारी डॉ. केदार रायकर उपस्थित होते. ही भागीदारी गोव्यातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या उद्देशाने भविष्यातील सहकार्यांसाठी एक आदर्श ठेवण्याची अपेक्षा आहे. हे सहकार्य, मोलबायोच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाचा भाग आहे. यातून सार्वजनिक आरोग्याची प्रगती आणि देशभरात वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी कंपनीची वचनबद्धता अधोरेखित होते.
मोलबायोने डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस यांना मोबाईल व्हेंटिलेटर, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, मल्टी-पॅरा ट्रूस्कोप मॉनिटर्स इत्यादी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा चार ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (एएलएस) रुग्णवाहिका प्रदान केल्या असून, या रुग्णवाहिका राष्ट्रीय महामार्गांवर तैनात करण्यात येणार आहेत, जे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि कार्यक्षम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करतील. या व्यतिरिक्त, नेत्र उपचार सेवांना चालना देण्यासाठी आणि रहिवाशांसाठी उपलब्ध नेत्ररोग सेवेची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये नेत्रचिकित्सा उपकरणेदेखील पुरवली जाणार आहेत. तसेच मृत व्यक्तींच्या पार्थिवांची योग्यरितीने वाहतूक करण्यासाठी दोन हेअर्स व्हॅनदेखील पुरवल्या जातील. आरोग्यसेवीतील अत्यावश्यक गरजांसाठी सुविधा उपलब्ध करून, स्थानिक जनतेचे कल्याण आणि आरोग्य सेवेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे मोलबायोचे उद्दिष्ट आहे.मोलबायोचे विपणन आणि कम्युनिकेशन्स विभागाचे उपाध्यक्ष अमिताव बॅनर्जी म्हणाले, “मोलबायोमध्ये, आम्ही नावीन्यपूर्ण उपाय आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे आरोग्यसेवा प्रगत करण्यासाठी समर्पित आहोत. गोवा डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस आणि गोवा कॉर्पोरेट सीएसआर अॅथॉरिटी गोव्यातील जनतेसाठी उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी योगदान देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”