no images were found
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई : एकनाथ शिंदे
नाशिक : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवरील कारवाईनंतर पुण्यात झालेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये सांगितले.
स्वामीनारायण मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले देश विघातक संघटनांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झालेल्या माहितीनुसारच कारवाई केली जात आहे. देश विघातक संघटनांवर कारवाई झाल्यानंतर होत असलेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणे योग्य नाही अशा घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा देखील अधिकार नाही पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर घातलेली बंदी योग्य आहे. बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र व राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. देशद्रोही विचारांचा राज्यात प्रसार होऊ देणार नाही.
भारत जोडो यात्रेत शिवसेनेला सामावून घेतले जाण्याचा विचार सुरू आहे यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मित हास्य करत यावर मी नंतर नक्की उत्तर देईन असे सांगत वेळ मारून नेली. राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झालेले आहे प्रत्येकाच्या मनातील सरकार स्थापन झाल्याने आनंद आहे सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे सरकारचे धोरण आहे.
सरस्वती चे फोटो काढणार नाही
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमधून सरस्वतीचे फोटो काढून त्या ऐवजी ज्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुले केली त्या फुले-शाहू-आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही असे स्पष्टीकरण देताना सर्वसामान्यांना काय वाटते तेच आमचे सरकार करेल अशी स्पष्टुक्ती जोडली.