
no images were found
शेती पिकांचे नुकसान व वन्यप्राणी हल्ल्याबाबत तत्काळ कार्यवाहीच्या सूचना – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना शासनाकडून नुकसान भरपाई 6 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मदत दिली जात आहे. वनांचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावकऱ्यांच्या पाठिशी शासन असेल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य रणधीर सावरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य अतुल बेनके, आशिष जयस्वाल, विश्वजित कदम, संदीप क्षीरसागर यांनीही सहभाग घेतला.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रानडुक्कर व रोहींना मारण्याची अनुमती शासनाने दिलेली आहे. वनविभागाशी संबंधित समस्या, अडचणी यावर वनविभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय असावा यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाने कुंपण करण्याची योजना केली आहे. या योजनेअंतर्गत 28 हजार 499 लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. वनवृत्ताच्या आसपास, बफर झोनच्या जवळील गावांना कुंपण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहेत. एक लाख लाभार्थी या योजनेसाठी अपेक्षित आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाले त्यांना 30 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचा कायदा केला असून संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
बिबट्या व वाघांची वाढती संख्या हा विषय गंभीर आहे. नसबंदी संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. वन विभागाने बिबट पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच याविषयीचे कार्यवाहीचे उपवनसंरक्षक (डिसीएफ) यांच्याकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्नर क्षेत्रात बिबट सफारी घेतली असून बिबट्याच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक विचार करेल. पर्यावरण, वनांचे रक्षण करणारे गाव, गावकरी यांना संरक्षण देण्यासाठी सरकार अनुकूल आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यासंदर्भात देखील सरकार अनुकूल असून याविषयी प्रस्ताव तयार करण्याचा विचार आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.