Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत: हिंदकेसरी दीनानाथ सिंह

शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत: हिंदकेसरी दीनानाथ सिंह

2 second read
0
0
28

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत: हिंदकेसरी दीनानाथ सिंह

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात उद्घाटन करण्यात येत असलेल्या कुस्ती संकुलामुळे शाहूकार्याचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये प्रवाहित होईल. तसेच या संकुलात आंतरराष्ट्रीय स्तराचे कुस्तीपटू घडावेत. त्यांनी कोल्हापूरसह राजर्षींचा आणि विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर करावा, असे प्रतिपादन हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी आज येथे केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य कुस्ती संकुलाचे उद्घाटन हिंदकेसरी श्री. सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यावेळी प्रमुख उपस्थित होते.

हिंदकेसरी श्री. सिंह म्हणाले, खेळाडूंनी कष्ट तर करायला हवेतच.पण त्याचबरोबर त्या कष्टाला आईवडिलांच्या पुण्याईची जोड आणि समाजाचे आशीर्वाद लाभणेही महत्त्वाचे असतात. यश मिळविण्यासाठी ज्ञानसंपन्नतेबरोबरच आरोग्यसंपन्नतेकडेही खेळाडूंनी लक्ष देणे गरजेचे आहे. कोल्हापूर ही अनेकांची आश्रयदाती भूमी आहे. माझा जन्म उत्तर प्रदेशातला, पण या शाहूनगरीतच मरण यावे, अशी आपली कृतज्ञ भावना असल्याचे सिंह यांनी सांगितले.

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, सन १८९७मध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाला. त्यानिमित्त शाहू महाराजांनी कुस्तीचे राष्ट्रीय मैदान ठेवले आणि तिथे पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातल्या पैलवानांना आमंत्रित केले. उत्तरेकडच्या या पैलवानांनी पंचगंगेच्या पैलवानांना अस्मान दाखविले. त्या पैलवानांना आता अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा पण करून महाराजांनी आपल्या पैलवानांना तयार करण्याचा चंग बांधला आणि अवघ्या तीन वर्षांतच आपला पण सिद्ध केला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कोल्हापूर कुस्तीची सुरवात झाली आणि कुस्तीगीरांची पंढरी म्हणून ते नावारुपाला आले. शिवाजी विद्यापीठात कुस्ती संकुल साकार झाल्याने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या मंदिलात तुरा रोवला गेला आहे. येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा व्हाव्यात आणि कोल्हापूर पुन्हा एकदा कुस्तीच्या क्षेत्रात अग्रेसर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कुस्ती संकुलाच्या रुपाने खेळाडूंसाठी मोठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तिचा वापर करून देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरण्यासाठी कुस्तीपटूंनी सिद्ध व्हावे. या संकुलामध्ये कुस्तीपटूंना प्रशिक्षण देत असताना कोल्हापूरच्या दिग्गज कुस्तीपटूंचा सल्ला घेऊन चांगले मल्ल तयार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कुस्तीपटू संभाजी पाटील, संभाजी वरुटे, रामचंद्र सारंग, रणजीत नलवडे, विक्रम कुराडे, वैष्णवी रामा कुशाप्पा, बदाम मगदूम, सौरभ पाटील, विजय पाटील, रेश्मा माने, स्वाती शिंदे आणि नंदिनी साळोखे या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.

कुस्ती संकुलाविषयी थोडक्यात…

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात साकारण्यात आलेल्या कुस्ती संकुलाचे क्षेत्रफळ ९५०० चौरस फूट इतके आहे. त्यावर १ कोटी ६७ लाख ४७ हजार ९६५ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. अभय तेंडुलकर व युवराज गोंजारे हे ठेकेदार असून वास्तुविशारद म्हणून समीर जोशी यांनी काम पाहिले आहे. विजय सापळे (आर्क क्राफ्ट ट्रान्सफॉर्मर्स) यांनी विद्युतकामाचे ठेकेदार म्हणून काम पाहिले आहे. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…