
no images were found
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार– जितेंद्र भोळे
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून 11 सदस्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड करण्यासाठी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे, उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शरद शिंदे, अवर सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सीमा सचिव तांबे यांच्याकडे 2 जुलै 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 122, पहिला मजला, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल.
नामनिर्देशन पत्रांची छाननी 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता विधानभवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवारांकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्यांच्या निवडणूक एजंटला या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कार्यालयात 5 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल.
त्याचप्रमाणे, निवडणूक लढविली गेल्यास 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
000