
no images were found
डी वाय पाटील अभियांत्रिकीचा इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार
कोल्हापूर (प्रतिनिधी): डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या गरुडा क्लब आणि इगलट्रोनिक्स एव्हिएशन कंपनीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाबाबतचा सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रामधील संशोधन, विकास आणि औद्योगिक सहकार्याला चालना मिळणार आहे.
डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक सेंटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये गरुडा क्लब ची स्थापना केली. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपयुक्त प्रयोग करण्यासाठी गरुडा क्लब कार्यरत आहे. विविध प्रकारचे ड्रोन तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कृषी सामाजिक आणि सुरक्षा या क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायीकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कॉर्डकॉप्टर, हेक्साकॉप्टर, एग्रीकल्चर ड्रोन, सर्व्हीलीएंस ड्रोन तयार करणे हे क्लबचे उद्दिष्ट आहे.
या सामंजस्य कराराद्वारे गरुडा क्लब आणि इगलट्रोनिक्स एव्हिएशन तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योग सहकार्य इंटर्नशिप आणि टिकाऊ किफायतशीर आणि तुलने स्वस्त ड्रोनचे उत्पादन करणे अशा विविध संधींवर एकत्रितपणे काम करणार आहेत. यामध्ये कृषी संरक्षण, देखरेख, खते व औषधे फवारणी यासारख्या प्रयोगांचा समावेश असेल. हा करार विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध वर्कशॉप, सेमिनार गेस्ट लेक्चर यांचे आयोजन केले जाईल.
या करारावर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी तर इगलट्रोनिक्स एव्हिएशनच्या वतीने संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत सूर्यवंशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते पाटील, फॅकल्टी कॉर्डीनेटर प्रांजल फराकटे, कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर धीरज माने आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.