no images were found
अन्यथा दुधगंगा धरणामध्ये जलसमाधी घेऊ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा इशारा
कोल्हापूर( प्रतिनिधी ) :- दूधगंगा धरण गळती दुरुस्ती प्रकरणी येत्या तीन जून पूर्वी वर्क ऑर्डर काढावी, अन्यथा दूध दूधगंगा धरणामध्ये येत्या तीन जून रोजी जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज देण्यात आलाय. याबाबतचे निवेदन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आलं.
सन १९९९ साली १२२० मीटर लांबीच्या दूधगंगा धरणाचं बांधकाम पूर्ण झालंय. या धरणामधून पाणी गळती सुरु आहे. कोणत्याही धरणाची गळती सर्वसाधारणपणे ७० लिटर/सेकंद च्या वरती वाढली तर त्या धरणास ती धोकादायक ठरते. २००७ साली दूधगंगा धरणातून ३६०.५० लिटर/सेकंद या प्रमाणात गळती होत होती. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानं सन २०१० ते २०१४ या कालावधीत दगडी धरणाच्या एकूण मोनोलीत मध्ये सिमेंट ग्राउंटिंगचं गळती प्रतिबंधक काम करण्यात आलं. त्यानंतर २०१६ साली संचय पातळीत १६६.६६ लिटर/सेकंद इतकी गळती आढळून आली. अधीक्षक अभियंता धरण सुरक्षित संघटना नाशिक यांनी २०२१ मध्ये केलेल्या पाहणीमध्ये ही गळती वाढत जावून २६४ लिटर/सेकंद असल्याचं आढळून आलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळ पुणे अंतर्गत गळती प्रतिबंधक योजने अंतर्गत विशेष दुरुस्तीसाठी ऐंशी कोटी बहात्तर लाख अकरा हजार आठशेहे चोपन्न रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवलाय. मात्र, अद्याप धरण गळतीच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली नाही. दुधगंगा धरण गळतीवर तातडीनं उपाययोजना करा. येत्या ३ जून पूर्वी या कामाची वर्क ऑर्डर न मिळाल्यास ३ जून रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जलसमाधी करणार असल्याचा इशारा उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहरप्रमुख सुनिल मोदी यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते