no images were found
दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! कोल्हापूर जिल्हयाचा निकाल ९८.२० टक्के
कोल्हापूर :महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेत कोल्हापूर विभागाने निकालात सातत्य कायम ठेवले आहे. दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागाने ९७.४५ टक्के गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांकावरील स्थान कायम राखले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ०.७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी विभागाचा निकाल ९६.७३ टक्के इतका होता. दुसरीकडे यंदा, कोकण विभागाने ९९.०१ टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (२७ मे) जाहीर करण्यात आला. मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सचिव सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचा निकाल घोषित केला. कोल्हापूर विभागात २३२७ शाळांमधील ३५६ केंद्रावर परीक्षा झाली. तीन जिल्ह्यात मिळून १,२८,२८० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १,२७,८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १,२४,५६७ इतकी आहे. विभागातंर्गत कोल्हापूर जिल्हयाचा निकाल ९८.२० टक्के इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ५२,९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२,८५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५१,९०५ इतकी आहे.
सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.९१ टक्के आहे. या जिल्ह्यातून ३७,२५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.पैकी ३७,१५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते. तर ३६,१०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.६६ टक्के आहे. या जिल्ह्यात ३८,०६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७,८१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३६,५४४ इतकी आहे. कोल्हापूर विभागात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०१.७१ टक्के इतके अधिक आहे. परीक्षेला ६८,७१६ मुले बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण मुलांची संख्या ६६,४१२५ आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.६६ टक्के आहे. परीक्षेसाठी विभागात ५९,१०२ मुली प्रविष्ठ होत्या. त्यापैकी ५८,१४२ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.३७ टक्के इतके आहे. विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी सात विद्यार्थी दोषी आढळले. त्यांची मार्च २०२४ परीक्षेतील गैरमार्ग केलेल्या विषयांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड, कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सातारा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सांगली येथील शिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, बोर्डाचे सहसचिव डी. स. पोवार, सहायक सचि एस. बी. चव्हाण, लेखाधिकारी एन. डी. पाटील, वरिष्ठ अधीक्षक एस. एल, हावळ, एस. वाय. दुधगावकर,एम.आर.शिंदे, सहायक अधीक्षक जे. एस. गोंधळे, जे. आर. तिवले आदी उपस्थित होते.