no images were found
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का !, -शरद पवार
लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर 4 जून रोजी निकाल लागेल. त्यानंतर देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. त्यात मोठा उलटफेर मिळण्याचे संकेत आहेत…
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे. प्रत्येक जण त्यांचा अंदाज मांडत आहे. घोडा आणि मैदान आता जवळ आहे. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागेल. पण त्यापूर्वीच एका मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील असा दावा करण्यात येत आहे. वंचितचे आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे याविषयीचे वक्तव्य पण चर्चेत आले होते. या प्रश्नावर शरद पवार यांनी पण उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचे मोठं विधान केले आहे.
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारणार असल्याचा दावा ते करत आहेत. या निवडणुकीत भाजपला आस्मान दाखवणार असल्याचे दावा इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील निकाल या निवडणुकीला दिशादर्शक असेल, असे दावे करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे भाजप पूर्ण बहुमताचा दावा करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नावाला पण उरणार नाही, असा दावा केला आहे. 50 जागांच्या आत हे सर्व गुंडाळले जातील आणि एनडीए बहुमताने तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला. ‘अब की बार 400 पार’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर कुठला पक्ष भाजपासोबत जाईल, हे मी सांगू शकत नसल्याचे शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितले. पण सध्या महाराष्ट्रात जशी परिस्थितीत आली आहे, तशी परिस्थिती ओढावल्यास समविचारी पक्षांची मोट बांधण्यात येईल. त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम तयार करु आणि जर संधी असेल तर तिचा पूर्ण फायदा घेऊ, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. म्हणजे केंद्रात समविचारी पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील आणि राज्यातील समीकरणं बदलतील. सत्तेच्या सारीपाटावरील चित्र वेगळं असेल. अनेक जण दिशा बदलतील असा दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा वारंवार करण्यात येत आहे. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील याची अजिबात शक्यता नाही. अजिबातच नाही. उद्धव ठाकरे भाजपा आणि मोदींसोबत जाणार नाहीत, नाहीत, नाहीत असे तीनदा पवारांनी या मुलाखतीत ठासून सांगितले.