Home शासकीय नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा – अमोल येडगे

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा – अमोल येडगे

10 second read
0
0
32

no images were found

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा – अमोल येडगे

 

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत दिल्या. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती, अचानक पडणाऱ्या वीजा व इतर आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जिल्ह्यातील प्रांत अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच इतर संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

        मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता नदीकाठावरील ३९१ पूरबाधित गावांमध्ये आवश्यक उपाययोजना राबवून संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने अगोदर, दरम्यान आणि नंतरचे नियोजन करण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. ते म्हणाले, तयारीसाठी प्रशासनाकडे तीन आठवडे असून आवश्यक नाले सफाई, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करणे, रस्ते पूलांचे परिक्षण करून योग्य निर्णय घेणे, नागरिक व पशूधनासाठी निवाऱ्याची सोय करणे आदी कामांबाबत तातडीने नियोजन करा. मागील पूरबाधित नागरिकांची नाव निहाय यादी तयार करुन त्यांना आवश्यक सूचना द्या. प्रत्येक टप्प्यावर काय करायचे आणि काय नाही याबाबत एसओपी तयार करा. भूस्खलन गावांची यादी तयार करून त्याठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून आवश्यक उपाययोजनांबाबत तयारी करा. राष्ट्रीय आपत्ती कृती दल तसेच जिल्हा आपत्ती चमूला कधी पाचारण करायचे याबाबत तालुकास्तरावर नियोजन करा. याव्यतिरीक्त संभाव्य पूरस्थिती दरम्यान अशासकीय संस्था, स्वयंसेवक, गावस्तरावरील युवक मोठ्या प्रमाणात योगदान देत असतात, त्यांचीही यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.

       प्रत्येक तालुक्यांमधे उपलब्ध असलेले आपत्ती निवारण विषयक साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. रस्ते, नदी-नाल्यांवरील पूल तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावा, पावसाचा अंदाज यावेळी चांगला असल्यामूळे पूरस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. हे करीत असताना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार होणार नाही याची पण काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आराखडा जिल्हास्तरावर 31 मे पूर्वी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हयात 4 मोठे, 10 मध्यम तर 56 लघू पाणी प्रकल्प आहेत, या ठिकाणी आवश्यक तयारी करून पाण्याचा विसर्ग व्यवस्थित होईल यासाठी सांडवा, नाले सफाई, आवश्यक दूरूस्ती करा. जिल्हा तसेच तालुका स्तरावरील प्रत्येक यंत्रणेने पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून चांगले नियोजन करा.

        जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1733.1 मिमी आहे. 2019 साली 2930 मिमी, 2020 साली 2034 मिमी, 2021 साली 1719 मिमी, 2022 साली 1552 मिमी तर 2023 ला 1171 मिमी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरातही मागील वर्षी 427 मिमी पावसाची नोंद झाली होती. 2019 च्या पूरामध्ये जिल्हयात पुर्णता वेढा पडलेली गावे 27 होती, अंशता 318 गावे बाधित झाली होती. 2021 साली 391 नदीकाठच्या गावांमधे पूरस्थिती निर्माण झाली होती. सन 2019 च्या पूरावेळी जिल्हयातील 12 तालुक्यांमध्ये एकुण 102557 कुटुंबांना तर 2021 मध्ये 72411 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते. 2019 पासून वीज पडून मृत्यूमुखी पडलेली मनुष्य संख्या 4, पुरात वाहून गेलेली मनुष्य संख्या 16 तर 179 लहान व 470 मोठी जनावरे दगावली आहेत. तसेच जिल्हयात सद्या भूस्खलन गावांची संख्या 86 आहे. या आकडेवारीच्या अनुषंगाने यावेळी कोणतीही जीवीतहानी होता कामा नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

धोकादायक इमारती, होर्डींग तत्काळ काढा

प्रत्येक गाव आणि शहरांमधील धोकादायक इमारती, होर्डींग तसेच पावसामध्ये धोका निर्माण होईल अशी ठिकाणे यांची तपासणी करून कडक कारवाई करून ती हटवा अथवा खाली करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या. सार्वजनिक ठिकाणी पाऊस, वारा यामूळे जीवीतास धोका निर्माण होईल अशा वास्तू अथवा होर्डींगबाबत 31 मे पूर्वी कार्यवाही करा. तसेच जुन्या पूलांचेही परिक्षण संबंधित यंत्रणेने करून आवश्यकते नूसार पाणी पातळी पाहून वाहतूकीस बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

निवारागृह सुस्थितीत करण्यात येणार

जर पूरस्थिती निर्माण झाली तर प्रत्येक गावात बाधितांची यादी अगोदरच तयार करून त्यांना कोणत्या निवारागृहात कोणी थांबायचे हे माहिती करून देण्यात येणार आहे. निवारागृहात आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तयारी करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक पशूधनही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक चारा सुविधा निर्माण व्हावी म्हणून पुरवठादारांची यादीही तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

औषधे, राशन, गृहोपयोगी वस्तू प्राधान्याने मूबलक स्वरूपात पोहोचवा

पूरस्थितीमूळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये मुबलक औषधे, राशन, गृहोपयोगी वस्तू प्राधान्याने पोहविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच पाण्यामूळे संपर्क तुटणाऱ्या गावांना मतद कार्य देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. जेष्ठ, गरोदर स्त्रीया, आजारी व्यक्ती यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने सांगितले. तालुकास्तरावरील तहसिलदार, गट विकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी समन्वयातून पूर बाधितांसाठी निवारागृह आणि इतर अनुषंगिक मदत द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…