
no images were found
तुकारामांचा शोध ही चिरंतन चालणारी गोष्ट – प्रा. समीर चव्हाण
कोल्हापूर (प्रतिनिधी): तुकारामांचा शोध ही चिरंतन चालणारी गोष्ट असे प्रतिपादन प्रा. समीर चव्हाण यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने आयोजित त्यांच्या अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात खंड एक आणि दोन या ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया आणि संत तुकारामांच्या अभंगाची विविध निरूपणे या विषयावर मुक्त
संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तुकारामाचे अभंग हे आपल्या परंपरेला तपासून घेतात. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, कबीर, गालीब, मीरा या परंपरेबरोबर, सूफी विचारधारेचा प्रभाव तुकारामांच्या अभंगावर असलेला दिसतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे प्रा. प्रवीण बांदेकर आणि प्रा. रणधीर शिंदे यांनी या ग्रंथावर चर्चा केली. प्रवीण बांदेकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, अखईं तें जालें हा ग्रंथ तुकारामांच्या अभंगाचे आधुनिक निरूपण असून
आजच्या काळाच्या संदर्भात तुकारामांचे अंभग खूप काही सांगू पाहतात. प्रा. रणधीर शिंदे यांनी तुकारामांच्या अभंगावर झालेल्या आजवरच्या निरूपणापेक्षा चव्हाण यांचा ग्रंथ कसा वेगळा आहे तसेच तुकाराम समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे याची मांडणी केली. संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन सुस्मिता खुटाळे तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अविनाश सप्रे, प्रा. शरद नावरे, प्रा. अवनीश पाटील, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. प्रभंजन माने, प्रा. अक्षय सरवदे, प्रा. शिवकुमार सोनाळकर, प्रा. धनंजय देवळालकर, प्रा.
निलांबरी जगताप, विभागातील सर्व संशोधक विद्यार्थी, एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.