no images were found
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात `कॅपॅसिटी बिल्डिंग अँड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक` या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात १८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, क्षेत्रीय अधिकारी, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या इमारतीमधील रहिवासी, सोसायटीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या निवडणुकीत २० मे २०२४ रोजी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निर्धार केला तर आपण नक्की एक सदृढ आणि सक्षम लोकशाहीकडे वाटचाल करू, असे `स्वीप`चे समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
निवडणुकीचे काम हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक दिवस देशासाठी या भावनेतून आपण सर्वांनी या कामात शंभर टक्के योगदान दिले पाहिजे. निवडणुकीच्या कामात शासन आणि मतदारांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपण सर्व आहात. जर आपण सर्वांनी ठरविले तर मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी जास्तीत-जास्त वाढवू शकतो. आपल्या या कामात जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य राहील, असे डॉ. दळवी यांनी सांगितले.
मतदानावेळी मतदारांना प्रेरित करण्यासाठी बूथ अवेअरनेस ग्रुप ( BAG ) सदस्यांनी प्रत्येकी २० घरांची जबाबदारी स्वीकारून मतदारांना प्रेरित व प्रोत्साहित करण्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले. निर्भयपणे व निष्पक्षपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडण्यासाठी आम्ही मतदान करणार, असा संकल्प याप्रसंगी उपस्थितांनी केला.
या प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पानवेकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, नायब तहसीलदार चंद्रशेखर चांदोरकर, माहिम विभागाचे `स्वीप`चे समन्वय अधिकारी प्रकाश भंडारी हे उपस्थित होते.