no images were found
‘घरंदाज सावली’ पुस्तकावर विद्यापीठात चर्चासत्र
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. उषा इथापे या केवळ इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या माताच नव्हत्या, तर एक थोर विदुषी सुद्धा होत्या. त्यांचे मोठेपण विस्मृतीच्या पडद्याआडून सामोरे आणण्याचे काम डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘घरंदाज सावली’ या पुस्तकाने केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रणधीर शिंदे संपादित ‘घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी’ या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
डॉ. गवस म्हणाले, कोणतीही संस्था ही इमारतींनी मोठी होत नसते. तिच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून ती मोठी होते. डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत तशा प्रकारचे भरीव योगदान आहे. अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलणे परवडणारे नसते. डॉ. इथापे यांचे कार्य अत्यंत परिश्रमपूर्वक डॉ. रणधीर शिंदे यांनी सामोरे आणले आहे. या व्यक्तीबद्दल लिहीले जात असताना त्याच्या बरोबरीने संस्थेचा इतिहासही संग्रहित झालेला आहे. डॉ. इथापे यांनी मार्गदर्शकाविना अत्यंत भरीव अशा प्रकारचे पीएच.डी. संशोधन केले. ते संशोधनही या निमित्ताने उजेडात आले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यासंदर्भात अत्यंत मौलिक स्वरुपाचे लिहीले आहे. भविष्यातील उजेडाची अर्थात संशोधनाची एक रेघ या निमित्ताने ओढली गेलेली आहे.
माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, डॉ. उषा इथापे यांनी शिवाजी विद्यापीठासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत न विसरता येणारी आहे. त्यांचे वात्सल्य आणि योगदान यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पहिली फळी घडली, जिने विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर केला. रणधीर शिंदे यांनी केवळ संपादकाची भूमिका न बजावता त्यापुढे जाऊन संशोधकाच्या नजरेतून पुस्तकाची मांडणी करताना अनेक बाबी सप्रमाण पुढे आणल्या आहेत, तर काही गोष्टी नव्याने प्रकाशात आणल्या आहेत.
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी आपल्या गतायुष्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे आणि शिवाजी विद्यापीठ या तीन गोष्टींमुळे माझ्यासारखा एक गवंड्याचा पोर राज्याचा शिक्षण संचालक, मध्य भारतातील एका मोठ्या विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला. येथूनच सर्वधर्मसमभावाची शिकवण घेऊन जगभर जाता येऊ शकले. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी इथापे बाईसाहेबांमुळे आयुष्यात काही तरी होऊ शकले, हे त्यांचे थोर उपकार आहेत. यावेळी गडहिंग्लजच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनीही डॉ. इथापे यांच्या अनेक आठवणी जागविल्या. त्या आम्हा गोरगरीब मुलांच्या माताजी होत्या, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. विद्यापीठाचे माजी कर्मचारी गजानन साळुंखे यांनीही डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. इथापे यांनी विद्यापीठ उभारण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण काढताना त्यांच्यामुळेच आपले कुटुंब उभे राहू शकले, अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ. उषा इथापे यांचा कार्यकाळ हा विद्यापीठाच्या पायाभरणीचा जसा होता, तसाच तो सुवर्णकाळही होता. कुलसचिव म्हणून त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. त्या जबाबदारीच्या सोबतच इथल्या विद्यार्थ्यांना घडविण्याची, उभे करण्याची जबाबदारीही त्यांनी शिरावर घेतली होती. त्याचे दर्शन सदर पुस्तकाद्वारे होते. त्यांनी लावलेल्या ‘कमवा व शिका’च्या रोपट्याला पाणी शेंदण्याचे काम काही काळ करता आले, याचे समाधान वाटते. प्रबोधिनीचे काम पुढे घेऊन जात असताना या योजनेतील पुढील फळ्यांतील विद्यार्थ्यांनाही सामावून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा. सी.टी. पवार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी शब्दशिवार प्रकाशनाचे इंद्रजीत घुले आणि मुद्रितशोधक विष्णू पावले यांचा सत्कार करण्यात आला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक यांच्यासह डॉ. इथापे यांचे कुटुंबीय आणि डॉ. इथापे यांच्या कार्यकाळात ‘कमवा व शिका’ योजनेतून शिकून बाहेर पडलेले अनेक ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.