
no images were found
आणखी कसदार लेखनाची जबाबदारी वाढली डॉ. चव्हाणः विद्यापीठातील हिंदी विभागात सत्कार
कोल्हापुर(प्रतिनिधी): लेखक हा पुरस्कारांसाठी लिहीत नसतो, तर तो समाजाला योग्य दिशा, प्रेरणा देण्यासाठी लिहीत असतो. याच विचाराने लिहीत राहिलो आणि समाजाने याची दखल घेत राज्य, राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिळत गेले. आता महाकवि कालिदास पुरस्कारामुळे आणखीन कसदार लेखनाची जबाबदारी वाढल्याचे जाणिव असल्याचे मत ज्येष्ठ हिंदी लेखक, समीक्षक व हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी व्यक्त केले.
डॉ. चव्हाण यांना त्यांच्या काव्य, गीत, गझल यातील दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विश्व हिंदू शोध संवर्धन अकादमी वाराणसी व बनारस हिंदू विद्यापीठाने नुकतेच महाकवि कालिदास या राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले. यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. चव्हाण सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. त्यांनी ज्या दिवशी काही लिहू शकत नाही, तो दिवस आयुष्यातील वाया गेलेला दिवस मानत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदीचे प्र. विभाग प्रमुख डॉ. ए. एम. सरवदे होते. त्यांच्या हस्ते डॉ. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी हिंदी विभागाला एका महान व्यक्तिमत्वाच्या विचारांचा वारसा मिळाला असल्याचे सांगत डॉ. चव्हाण यांचे समग्र साहित्य हे विद्यार्थ्यांसाठी सतत प्रेरणादायी आहे. अशी भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. चंदा सोनकर, डॉ. अक्षय भोसले, प्रकाश निकम, विद्यार्थी प्रियंका बालेशगोल, फरदीन जमादार, अमृता खोत यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय सदामते यांनी केले. यावेळी प्रा. संपतराव जाधव (जयवंतराव चव्हाण महाविद्यालय, इचलकरंजी), डॉ. प्रकाश मुंज, संशोधक विद्यार्थी अनिल मकर, मेघा तोडकर, प्राजक्ता कुरळे, प्राजक्ता रेणुसे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, एम.ए हिंदी व भाषा प्रौद्योगिकी विषयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.