no images were found
देवगड हापूस आंबा कोल्हापूर शहरातील निवडक टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध
कोल्हापूर : भारतीय टपाल विभाग शेतकरी, लहान पुरवठादार, सामान्य उत्पादक, लहान उद्योजक इ.ना त्याची उत्पादने वाजवी दरात ग्राहकापर्यंत पोहोचवून व बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्नशील राहिलेला आहे. याच भूमिकेतून कोकणाचा राजा अस्सल ‘देवगड हापूस आंबा’ आता कोल्हापूर शहरातील निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“शेतकरी ते थेट ग्राहक” या संकल्पनेचा वापर केला असून कोकणातील नामवंत फळ उत्पादक श्रीधर पु. ओगले, दहिबाव देवगड यांच्या सोबत करार केलेला आहे. श्रीधर पु. ओगले, दहिबाव देवगड हे कोकणातील नामवंत आंबा फळ उत्पादक असून ते या व्यवसायात १८ वर्षे कार्यरत आहेत. तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचे अध्यक्ष असून त्यांच्या बागेतील आंबा फळास GI Tag हे मानांकन प्राप्त झालेले आहे. ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा उपलब्ध करून देणार असून हा आंबा कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापराशिवाय पिकवलेला असणार आहे. त्यामुळे ग्राहकांन खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार असून त्यांना खऱ्या अर्थाने कोकणी मेवा उपभोगता येणार आहे.
यासाठी ग्राहकांना कोल्हापूर शहरातील खालील टपाल कार्यालयाच्या ठिकाणी आगावू नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच त्यांच्या आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येणार असून त्याच कार्यालयात आंबा पेटी प्राप्त होणार आहे. पेटी घरपोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने नोंदणी करण्यास सुरुवात केलेली आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच प्राधान्याने माल देण्यात येणार असल्याने, ग्राहकांनी आगावू नोंदणी करावी व आपली गैरसोय टाळावी.
टपाल कार्यालयाची ठिकाणे-कोल्हापूर हेड पोस्ट ऑफिस, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, कोल्हापूर आर एस पोस्ट ऑफिस, प्रतिभानगर पोस्ट ऑफिस, फुलेवाडी पोस्ट ऑफिस, इचलकरंजी हेड पोस्ट ऑफिस, जयसिंगपूर पोस्ट ऑफिस, गांधीनगर पोस्ट ऑफिस, गडहिंग्लज मुख्य डाकघर येथे नोंदणी करण्यात येणार आहे.