no images were found
आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा
राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांचे आवाहन
कोल्हापूर, : भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात राजकीय पक्षांनी सहकार्य करून आदर्श आचार संहिता भंग होणार नाही याची काळजी घेवून आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर जिल्हयातील सर्व राजकीय पक्षांची बैठक आचार संहिता लागू झाल्यानंतर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या निवडणूक प्रक्रियेतील विविध सूचना उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिल्या. ते म्हणाले, निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. आदर्श आचार संहिता लागू झाल्यामूळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईने तपासले जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना प्रलोभन दाखवू नये. यावेळी बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका रवीकांत अडसूळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना व निवडणूकीबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली. ते म्हणाले, उमेदवारांचे नामनिर्देशन 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान कार्यालयीन वेळेत 11.00 वा. पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत सादर करावे. यात 13, 14 व 17 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्रे स्विकारली जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहने आणि उमेदवाराबरोबर इतर ४ व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. तसेच मतदान संपण्याच्या आधी 48 तास अगोदर प्रचार बंद होईल. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाचा हिशोब दररोज द्यावा लागेल. उमेदवार निवडून आल्यानंतर सर्व हिशोब 30 दिवसांच्या आत सादर करावा लागेल.
तसेच उमेदवारांनी तयार केलेल्या निवडणूक प्रचारासंबंधी सर्व छापील साहित्यावर प्रिंटर्सचा तपशील, संख्या व त्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. होर्डीगवर मंजूरी आदेश क्रमांक टाकावा लागेल. इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहीरात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून मंजूर करून प्रसिद्ध करावी लागेल. या सर्व प्रकारातील खर्च दैनंदिन स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. याव्यतिरीक्त राजकीय पक्षांना लहान मुले प्रचारासाठी वापरता येणार नाहीत. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही राजकीय कार्यात सहभागी करून घेता येणार नाही. राजकीय कार्यक्रमांच्या व इतर आवश्यक परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजी सभागृहात एक खिडकी योजना सुरू केली आहे. सर्व आवश्यक परवानग्या घेवूनच कार्यक्रम करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. या बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आपापल्या समस्यांचे निराकारण यावेळी केले.