no images were found
कोल्हापुरातील महिला सशक्तीकरण अभियान मेळावा राज्यात आदर्शवत व्हावा – अमोल येडगे
कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजीतील कोरोची येथे होणारा महिला सशक्तीकरण अभियान मेळावा सूक्ष्म नियोजनातून राज्यभरात आदर्शवत व्हावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली.
राज्यात महिलांसंदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोचीतील मैदानावर शुक्रवार दि. 8 मार्च रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, तालुक्यातून येणाऱ्या लाभार्थी महिलांना एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या महिलांना नाश्ता, भोजनाची पॅकेट, ओआरएस, पिण्याचे पाणी द्या. एखादी गाडी तांत्रिक कारणास्तव बंद झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करुन सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. जागतिक महिला दिनी हा मेळावा होत असल्यामुळे महिला दिनाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाची आखणी करा. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या शासन आपल्या दारी अभियानाप्रमाणेच महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत उत्कृष्ट होईल, असे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिल्या.
कोणत्याही महिला लाभार्थीची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या. शासकीय योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांचे अनुभव कथन करणाऱ्या चित्रफिती तयार करुन त्या कार्यक्रमस्थळी प्रसारित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या. यावेळी त्यांनी लाभार्थी निवड, कार्यक्रमाचे ठिकाण, आसन व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, प्रदर्शनी, फिरते स्वच्छतागृह, आवश्यक वैद्यकीय पथक, अल्पोपहार व पिण्याचे पाणी तसेच मंडप व बैठक व्यवस्था याबाबतचा आढावा घेवून संबंधित विभागांना सूचना केल्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह व अन्य नियोजन नीटनेटके करा. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची, मान्यवरांची बसण्याची व त्यांच्या पासेसची व्यवस्था करा. उन्हाची तीव्रता लक्षात घेवून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, असे सूचित केले. तसेच नोडल अधिकारी व त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या, झालेल्या व उर्वरित कामांचा सविस्तर आढावा घेऊन दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना देवून सविस्तर मार्गदर्शन केले. महिला दिनाच्या संकल्पनेवर आधारित स्वागत कमानी- कार्यक्रम स्थळे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी व सेल्फी पॉइंट जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक पद्धतीने तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.
स्त्रीशक्तीचे होणार दर्शन
मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत. यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात येणार आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील निवडक महिलांच्या बचत गटांचे व विविध शासकीय विभागांचे महिलांशी संबंधित योजनांचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या या महिला मेळाव्यात स्त्रीशक्तीचे दर्शन घडवण्यात येणार आहे.