no images were found
विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेत ३५० जणांचा सहभाग
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित पन्हाळा-पावनखिंड शिवपावन प्रेरणा मोहीमेस यंदाही गतवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद लाभला. ३०० स्वयंसेवकांसह ५० प्रशासकीय सेवकही यात सहभागी झाले. शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि चिखली येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मोहीम आयोजित करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते २४ फेब्रुवारीला शिवपावन प्रेरणा मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. मोहिमेदरम्यान शिस्त, पावित्र्य राखण्याचे आवाहन करताना विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार आणि कृती यांचे पाईक होण्यासाठी प्रतिबद्ध व्हावे, असेही कुलगुरूंनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. चिखली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, मोहिमेचे समन्वयक डॉ. पोपटराव माळी, चिखली महाविद्यालयातील कर्मचारी तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील स्वयंसेवक उपस्थित होते.
२५ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून मोहिमेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २५ किलोमीटर अंतर चालून खोतवाडीमार्गे पन्हाळा ते मसाई पठार करून करपेवाडी मुक्कामी स्वयंसेवक पोहोचले. विद्यापीठाच्या वतीने करपेवाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्कूल बॅग, स्केच पेन, पेन्सिल, पेन आदींचा समावेश होता. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिवशाहीर रंगराव पाटील यांचे पोवाडा सादरीकरण झाले. २६ फेब्रुवारीला दुपारी पांढरेपाणी येथे मोहीम पोहोचली. तेथे भोजन करून पावनखिंड येथे सायंकाळी चार वाजता मोहीम पोहोचली. दुपारी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील उपस्थित होते. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर कोल्हापुरातील शिवशंभो तालीम आखाडा यांनी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.