no images were found
शिवाजी विद्यापीठात २६ पासून राष्ट्रीय विज्ञान सप्ताह
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात येत्या २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सप्ताहभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ हा विषय घेण्यात आला असून त्याच अनुषंगाने तज्ज्ञांची व्याख्याने, प्रकल्प स्पर्धा व अन्य उपक्रम आयोजित केल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ. पवन गायकवाड आणि डॉ. समन्वयक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी दिली आहे.
डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) सकाळी १०.३० वाजता पदार्थविज्ञान अधिविभागाच्या सभागृहात राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभाचे उद्घाटन होईल. यावेळी गोवा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. आर.एस. गड यांचे बीजभाषण होईल. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूरच्या डॉ. दीपक शेटे यांचे आणि २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ. सतीश शर्मा यांचे व्याख्यान आयोजिले आहे. याखेरीज विज्ञान प्रदर्शन (दि. २७), प्रकल्प स्पर्धा (दि. २८), निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धा (दि. २९), प्रश्नमंजुषा स्पर्धा (दि. १ मार्च), समारोप समारंभ व पारितोषिक वितरण (दि. २ मार्च) असे उपक्रम राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहांतर्गत राबविण्यात येणार आहेत.