
no images were found
भाजपाचं फडकं राष्ट्रध्वज होऊ शकत नाही – उद्धव ठाकरें
“भाजपाचं फडकं आमचा राष्ट्रध्वज होऊ शकत नाही, ते पुसायला ठेवा. तुमचं फडकं तुमच्याकडेच ठेवा. आमच्या तिरंग्याला हात लावलात तर भस्म करून टाकू”, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जनसंवाद मेळाव्यात दिला. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या गाड्या सध्या गावागावात जात आहेत. त्या गाड्यांवर मोदी सरकार असे नाव असलेले फलक लावले आहेत. “सरकारने राबविलेल्या योजना या भारत सरकारच्या आहेत, मोदी सरकारच्या नाहीत. तुम्ही भारताचे नावही बदलणार आहाता का? त्या गाड्यांवर भाजपाचा झेंडा कशासाठी?” असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. आज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे शिवसेना उबाठा गटाची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
“पंतप्रधान मोदी सगळीकडे घराणेशाही, घराणेशाही करत आहेत. होय मी घराणेशाहीतून आलो आहे. मी प्रबोधनकारांचा नातू आणि बाळासाहेबांचा पुत्र आहे. तुमच्याकडेही अशोक चव्हाण यांच्यारुपाने घराणेशाहीतील नेता आला आहे. आमचे गद्दार मुख्यमंत्री आणि त्यांचा खासदार मुलगा ही घराणेशाही नाही का? शिवसेना, काँग्रेसमधून आलेली घराणेशाही भाजपाला चालते. अगदी अजित पवारही घराणेशाहीतूनच आलेले आहेत. ही सगळी लोक तुम्हाला चालतात. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच तुमच्या पाठीवर हात ठेवला म्हणून वाचलात, नाहीतर आज दिसलाही नसतात. त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्हाला नकोय का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
स्वामीनाथन यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. पण स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या शिफारसींचे काय? आज दिल्लीच्या सीमेवर युद्ध सुरू आहे. तिथे लष्कर आणून ठेवायचे बाकी आहे. हमीभाव मिळाला पाहजे, म्हणून शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. ते दिल्लीत येऊ नयेत, म्हणून त्यांच्यासमोर काँक्रिटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना उभे केले जात आहे. पण ते पोलिसही त्याच शेतकऱ्यांची मुले आहेत. भारताच्या अन्नदात्यावर तुम्हाला गोळ्या झाडायच्या आहेत का? शेतकरी फक्त मत देण्यासाठी आहेत का? एकदा मत दिले की, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी मोकळे ठेवायचे आणि सुटाबुटातल्या मित्रांची काळजी करायची. तुमच्या या मित्रशाहीला जनता संपवेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. सदाशिव लोखंडे यांनी दोन वेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा वेगळा गट केल्यानंतर लोखंडे यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात लोखंडेंना पराभूत करा, असे आवाहन केले. शिर्डीचे खासदार लोखंडे मागच्या वेळेसच निवडून येणे कठीण होतं. पण शिवसेनेने उमेदवारी दिलीये म्हणून इथल्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. यावेळी भाजपा त्यांना तिकीटही देणार नाही. लोखंडे यांनी शिवसेना पळविण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांना आता शिवसैनिक पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.