no images were found
रंकाळा संवर्धनाचा निधी इतरत्र वापरू नये : श्री. क्षीरसागर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी रंकाळा संवर्धनाच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र खर्ची होणार नाही याची खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी. दररोज फिरायला येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सोयी- सुविधा पुरवाव्यात यासह पुरातत्व खात्याची परवानगी घेवून ऐतिहासिक संध्यामठाच्या संवर्धनाचा अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. आज सकाळी श्री.राजेश क्षीरसागर यांनी रंकाळा सभोवती मनपा आयुक्त श्रीमती के.मंजूलक्ष्मी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक केले. यावेळी रंकाळा तलावावर दररोज व्यायाम, योगा करण्यासाठी येणाऱ्या रंकाळा प्रेमी नागरिकांच्या समस्या जाणून घेत यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, रंकाळा तलाव परिसरात अवैद्य प्रकार वाढले आहेत. याठिकाणी गस्त घालण्यासाठी दिवस – रात्र गस्ती पथकाची नियुक्ती करून अवैद्य प्रकारांवर आळा घालावा. रंकाळा बोटिंग परिसराची स्वच्छता करावी. याठीकाणच्या ओपन जिमची व लहान मुलांची खेळणी तात्काळ दुरुस्ती करावी. याठिकाणी नागरिकांसाठी योगा केंद्राची निर्मिती करण्यात यावी. रंकाळा उद्यान परिसरात १०० बेंचेस बसविण्यात यावेत. वॉकिंग ट्रॅक, पदपथावरील निखळलेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसविण्यात यावेत. बेळगाव पॅटर्नप्रमाणे ॲक्युप्रेशर ट्रॅक निर्माण करावेत. रंकाळा तलाव परिसरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची बांधणी करावी. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
गेल्या चार – पाच दिवसात रंकाळा तलावातील मादी हंसाची शिकार झाल्याचा प्रकार धक्कादायक असून, याची फिर्याद महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ द्यावी. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने चौकशी करून प्राणी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी. यासह या रंकाळा तलावावरील पक्षी संरक्षणासाठी परिसरात लाईटची व्यवस्था करावी. सीसीटीव्ही बसवून निगराणी करावी. पक्षांची माहिती देणारे माहिती फलक जागोजागी लावावेत, अशा सूचना दिल्या.
यानंतर रंकाळा खण विहार येथील परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी रंकाळा खणीमध्ये पोहायला येणाऱ्या नागरिकांसाठी खणीचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. यासह याठिकाणी शॉवर व चेंजिग रूमची व्यवस्था करावी. यासह शाहू स्मृती उद्यान येथे कमान बसवावी. या उद्यानातही होणाऱ्या अवैद्य प्रकारांवर आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.
यानंतर ऐतिहासिक संध्यामठ परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी सूचना देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ऐतिहासिक संध्यामठ वास्तूचा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या वर्ग १ वास्तूंमध्ये समावेश आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नियमावलीचा अभ्यास करून मनपा आयुक्त, शहर अभियंता आणि आर्किटेक्ट यांची संयुक्त बैठक घ्यावी. उन्हाळा कालावधीत रंकाळा तलावाची पाणी पातळी घटल्यानंतर ऐतिहासिक संध्यामठ वास्तू डागडुजी व संवर्धनाचा अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून कामास सुरवात करण्यात यावी.
*रंकाळा शाहू स्मृती उद्यानात राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारा : श्री.राजेश क्षीरसागर*
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक कोल्हापूरचे जनक आहेत. त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या अमूल्य वास्तू आजही कोल्हापूरच्या विकासात योगदान देत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या प्रगतीचे एक एक नवे पान लिहिले गेले. कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात त्यांचा लाखमोलाचा वाटा आहे. कोल्हापूरकरांसाठी दैवत असणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा स्मृती उद्यानात उभारण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने आराखडा तयार करावा, अशा सूचनाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, आयुक्त श्रीमती के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहरअभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, पुरातत्व समितीच्या श्रीमती निंबाळकर, उद्यान अधिकारी समीर व्याघ्राम्बरे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पाटोळे आदी अधिकारी, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपशहरप्रमुख सचिन राऊत, निलेश गायकवाड, रुपेश इंगवले, धनाजी कारंडे, सुनील भोसले, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, शैलेश साळोखे, प्रशांत गडकरी आदी शिवसेना पदाधिकारी व रंकाळा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.