no images were found
डी. वाय. पाटील ग्रुपच्या १३६ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डॉ.डी वाय पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी केले.
डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के बोलत होते. तळसंदे येथील डी. वाय.पाटील एज्युकेशनल सिटी येथील शांताई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील, सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्कॉलरशिप स्कीमचे अध्यक्ष आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक ए. के.गुप्ता यांनी केले. यावेळी बोलताना डॉ.डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी शिष्यवृत्ती योजनेचे स्वरूप विषद केले. ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून आपापल्या विभागात प्रथम क्रमांकाचे प्राविण्य मिळविले आहे त्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. आईसाहेबांच्या जन्मदिनी गतवर्षी हि योजना सुरु केली आहे. या योजनेत प्रथम वर्षी ६६ विद्यार्थ्यांना तर यावर्षी १३६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण वर्षाची फी माफ केली जात आहे.
आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व असते. आमच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा आहे. आई वडिलांचे संस्कार आणि त्यांनी केलेले कष्ट न विसरता विद्यार्थ्यांनी आयुष्यात कार्यरत राहून इतर विद्यार्थ्यांना मदत करावी. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने किमान एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला चांगले शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले. आईसाहेबांच्या वाढदिनी यावर्षी विदयार्थ्यांना 1 कोटी 51 लाख रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येत आहे. स्कॉलरशिप प्राप्त झालेल्या विदयार्थ्यांनी सुद्धा आई वडिलांप्रति कृतज्ञता बाळगत आपणही भविष्यात दातृत्व जपावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी डॉ.डी. वाय.पाटील समूहाच्या या स्कॉलरशिप उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन आपल्या आईचा वाढदिवस साजरा करणारे हे एकमेव कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ कौतुक समारंभ नसून मूल्यनिष्ठ कुटुंब व्यवस्था समजून घेऊन ती जपण्याचा आणि हा विचार इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. पाटील कुटुंबीयांवर आईवडिलांकडुन झालेल्या संस्काराचे बीज पुढील पिढ्याना प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रयत्न पूर्वक उभारलेल्या ग्रुपला व कुटुंबाला सौ. शांतादेवी पाटील यांनी संस्कार व मूल्यांचे अधिष्ठान दिले. डी. वाय. पाटील कुटुंबातील सर्वच सदस्यांनी उत्तुंग यश मिळवून सुद्धा त्यांच्यामध्ये असलेली नम्रता ही आई वडिलांच्या संस्कारातून आली आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे असलेली नम्रता हि आईसाहेबांच्या संस्कारातून आली आहे.
या समारंभात माजी राज्यपाल पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून सौ. शांतदेवी पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आई साहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रपट दाखवण्यात आली.
या समारंभाला डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील, तेजस पाटील, सौ.पूजा ऋतुराज पाटील, सौ.वृषाली पृथ्वीराज पाटील, मेघराज काकडे, करण काकडे, सौ. चैत्राली काकडे, अजितराव बेनाडीकर, देवराज पाटील,कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम, कुलगुरू राकेश कुमार मुदगल, कुलगुरू के प्रथापन, मेडिकल कॉलेज डीन आर के शर्मा,कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, लोकमतचे संपादक डॉ वसंत भोसले, तरुण भारतचे संपादक मनोज साळुंखे, पुण्यनगरीचे संपादक राजकुमार चौगुले यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुप मधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्कॉलरशिपप्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. राधिका ढणाल व प्रा. श्रुती काशीद यांनी केले.