no images were found
पंतप्रधान मोदीही झाले स्वाती मिश्रा फॅन ?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाती मिश्राच्या आवाजातील ‘मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आंगना सजाऊंगी’ हे भजन ऐकलं आणि ते कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी तिचं कौतुक केलं. ती पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. स्वातीनं आपल्या आवाजानं राम भक्तांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.
मोदी यांनी देखील स्वातीच्या त्या भजनाची लिंक शेयर करुन तिच्यासाठी खास संदेशही दिला आहे. ते म्हणतात, श्री राम लला च्या स्वागतासाठी स्वाती मिश्रानं ज्या भक्तिभावात राम भजन गायलं आहे ते मंत्रमुग्ध करणारे आहे. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
स्वाती मिश्रा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिनं राम आयेंगे नावाचे गाणे गायले होते. ‘मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आंगना सजाऊंगी’ नावाचे श्रीरामाचे भजन तिनं गायले आणि तिला प्रेक्षक, चाहते आणि भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर त्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही खूपच बोलक्या आहेत.
मीडिया रिपोर्टनं दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ही सध्या मुंबईत राहते. तिचं मुळचं गाव बिहार राज्यातील छपरामधील माला हे आहे. यापूर्वी स्वातीनं वेगवेगळी भजनं गात चाहत्यांना जिंकून घेतले आहे. स्वातीच्या त्या भजनांना चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी तिला इंस्टावर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याची कोट्यवधी भारतीयांना उत्सुकता आहे. यानिमित्तानं देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्याला देशविदेशातील पाहुणे मंडळीही येणार आहेत.
बॉलीवूडमधील सेलिब्रेटी देखील याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार, बिग बी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींना निमंत्रण नाकारण्यात आल्यानं मोठा वाद झाला होता. केवळ बॉलीवूडच नाही तर राजकीय आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. स्वातीला या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.