Home राजकीय ‘इंडिया’तील मतभेद ,शरद पवार-राहुल गांधींमध्ये खलबते

‘इंडिया’तील मतभेद ,शरद पवार-राहुल गांधींमध्ये खलबते

2 second read
0
0
24

no images were found

‘इंडिया’तील मतभेद ,शरद पवार-राहुल गांधींमध्ये खलबते

‘इंडिया’तील मतभेद मिटवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये जागावाटपावरून नेत्यांनी एकमेकांना निर्वाणीचा इशारा दिल्यामुळेही राहुल गांधी व शरद पवार यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’तील खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे महाआघाडीतील नेत्यांचे संयुक्त आंदोलन झाल्यानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीमधून रवाना झाले. जंतर-मंतरवरून दोन्ही नेते थेट पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘६ जनपथ’ या निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. यामध्ये राज्यातील जागावाटपाच्या मुद्द्याचाही समावेश असल्याचे समजते. काँग्रेसच्या दृष्टीने महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब व बिहार आदी राज्यांमध्ये जागावाटपाचा मुद्दा गंभीर बनू लागला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून तीसहून अधिक जागांबाबत सहमती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसच्या जागांसदर्भात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. पवार व राहुल गांधी यांच्यातील सल्लामसलतीमुळे राज्यातील महाविकास आघाडीतील चर्चेलाही गती मिळाल्याचे सांगितले जाते.
‘इंडिया’च्या मंगळवारी झालेल्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्येही राज्यातील जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता. जागावाटपासंदर्भात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुंबईमध्ये चर्चा झालेल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यामध्ये चर्चा होणे गरजेची होती. उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यातील बैठकीनंतर राहुल गांधी व शरद पवार यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक झाली असल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे समजते.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तसेच, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ‘इंडिया’च्या पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावामुळे नितीशकुमार व लालूप्रसाद यादव हे बिहारमधील महायुतीतील दोन्ही नेते नाराज झाल्याचे सांगितले जाते. नितीशकुमार यांनी उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, जनता दलातील नेते खरगेंना विरोध करत आहेत. खरगेंच्या नावाच्या प्रस्तावामुळे ‘इंडिया’तील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत. नितीशकुमार यांच्या रागावर फुंकर घालण्यासाठी राहुल गांधी यांनी गुरुवारी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. खरगेंनीही नितीशकुमार व शरद पवार यांच्याशी संवाद साधल्याचेही समजते. या घडामोडीनंतर शुक्रवारी राहुल गांधी व शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ‘इंडिया’तील नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी पवार मध्यस्थी करण्याची शक्यता दिसू लागली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…