
no images were found
स्मिता पाटील यांना या जगातून जाऊन ३६ वर्षे पूर्ण झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : मराठी तसंच हिंदी सिनेमाविश्वामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं. भलेही आज स्मिता पाटील आपल्या नाहीत. परंतु त्यांनी केलेल्या सिनेमांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.स्मिता पाटील यांना या जगातून जाऊन आजच्या दिवशी ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
१३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतिक हा अवघा दोन आठवड्यांचा होता. प्रसुतीनंतर निर्माण झालेल्या गुंतागुतीमुळे स्मिता यांचं निधन झालं होतं. आज त्यांना जाऊन इतकी वर्षे लोटली तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या मनात ताज्या आहेत.
स्मिता यांच्या संदर्भातील एक आठवण सांगितली जाते. खरं तर स्मिता या अतिशय साध्या रहायच्या. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असूनही तिथल्या झगमगाटापासून त्या दूरच असायच्या. त्यांची खरी ओळख ही त्यांच्या अभिनयामुळे झाली होती. गलियोंका बादशाह या सिनेमाचं स्मिता चित्रीकरण करत होत्या. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, राज कुमार, डॅनी यांसारखे त्यावेळचे प्रसिद्ध नट होते. सिनेमाच्या मेकअप रुममध्ये स्मिता यांनी ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांना झोपून मेकअप करताना पाहिलं. ते पाहून स्मिता यांना खूप आश्चर्य वाटलं. कारण याआधी असा झोपून मेकअप करताना त्यांनी कुणालाच पाहिलं नव्हतं.
त्यानंतर स्मिता या त्यांच्या मेकअप रूममध्ये गेल्या. तिथं गेल्यानंतर त्यांनी त्यांचा मेअकपमन दीपक सावंत यांच्याकडे झोपून मेकअप करायची इच्छा व्यक्त केली. इच्छा कसली खर तर हट्टच धरला होता. स्मिता यांचा हा हट्ट ऐकून सावंत यांना धक्का बसला. त्यांनी सांगितलं झोपून मेकअप करता येणार नाही.
त्यावर स्मिता यांनी सावंत यांना सांगितलं की, ‘का नाही होणार… राजकुमार पण झोपूनच मेकअप करतात ना..’ त्यावर सावंत यांनी स्मिता यांना सांगितलं की, ‘ते राजकुमार आहेत. मनात येईल, तसं ते वागतात. झोपून मेकअप केला तर तो खराब होईल आणि मला तसा करतानाही त्रास होईल,’ असं सांगत सावंत स्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत होतं. परंतु स्मिता काही कबूल करायला तयार नव्हती. अखेर स्मिता यांना बसून मेकअप करण्यासाठी सावंत यांनी कसंबसं तयार केलं.
गलियों के बादशाह या सिनेमाच्यावेळी स्मिता यांची झोपून मेकअप करण्याची इच्छा अपूर्ण राहिले होती. परंतु जेव्हा स्मिता यांचं निधन झालं. निरोप देतेवेळी स्मिता यांना नववधूप्रमाणं सजवण्यात आलं होतं. मृत्यूपूर्वी स्मिता यांनी सांगितलं होतं की, ‘जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला नववधूप्रमाणं सजवून निरोप द्या…’ १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांनी सांगितलेली शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली.