
no images were found
नेट परीक्षेला जाताना आत्मविश्वास महत्वाचा : डॉ.कृष्णा पाटील
कोल्हापूर(प्रतिनिधी) : विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी नेट परीक्षा सुरु होत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना आत्म विश्वास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ.कृष्णा पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सेट नेट
कार्यशाळेचे विषयनिहाय दि. 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये सेट नेट परीक्षेला सामोरे जाताना याविषयावर ऑनलाईन आयोजन करण्यात आले असून त्यातील पेपर पहिला यावर डॉ.पाटील मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे उपस्थित होते. डॉ.पाटील म्हणाले की,सेट नेट परीक्षेसाठी यशाची पंचसूत्री आहे,त्यामध्ये एक अभ्यासक्रमाचे सुयोग्य आकलन पाहिजे. दोन व्यापक व पुरेशा सातत्य पूर्ण सराव असणे महत्वाचे आहे.तीन सुस्पष्ट व पुरेसे मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे.चार त्यासाठी योग्य संदर्भ ग्रंथांची निवड करता आली पाहिजे आणि पाच प्रश्नपत्रिकेचे यथार्थ आकलन असले पाहिजे. सरावातील सातत्यच विद्यार्थ्यांना सेट नेट परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे.अपयशाने खचून न जाता पुन्हा अभ्यास करणे महत्वाचे आहे.त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. या परीक्षेसाठी तंत्र पद्धतीला सर्वात जास्त महत्व आहे.ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.असे डॉ.पाटील म्हणाले.
प्रा.डॉ.मोरे म्हणाले की,कोणत्याही स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांची असली पाहिजे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे. दुपारच्या सत्रात इतिहास विषयावर डॉ.दत्तात्रय मचाले यांनी व इंग्रजी या विषयावर डॉ.एस.बी.परिट यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी १७० हून अधिक विद्यार्थी वेबेक्स लिंकद्वारे सामील झाले होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डॉ.सुशांत माने यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी केले.आभार डॉ.चांगदेव बंडगर यांनी मानले.