
no images were found
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या चर्चा दर काही दिवसांनी रंगत असतात. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय. 2024 ला फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान करताना ठाकरेंवरही निशाणा साधला. फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाहीत असा टोला बावनकुळेंनी लगावला.भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला तिथे चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सुतोवाच केलं.जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विषय येतो, तेव्हा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. मात्र भंडा-यात बावनकुळेंनी थेट फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानं शिंदे गटाची धडधड वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा घोषणा भंडा-यातील कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळेंसह कार्यकर्त्यांनी दिल्या. नवीन सरकारमध्ये वानखेडे स्टेडियमवर पुन्हा नवीन शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा दावा बावनकुळेंनी यावेळी केला. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.