
no images were found
राज्याला अवकाळी पावसाचा फटका; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई : राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. तर, केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी 2600 कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली असून, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार तातडीची मदत देण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज बोलवण्यात आलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अनिल पाटील नाशिकमधील निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी काही वेळात पोहचणार आहे. स्वतः बांधावर जाऊन पाहणी करून त्यानंतर तत्काळ मुंबईत बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आह.
आधीच राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम वाया गेला असून, रब्बी हंगामातून काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा होती. मात्र, परवापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असून, ही बाब लक्षात घेता अजित पवारांनी तत्काळ बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना तातडीने कशाप्रकारे मदत पोहचवता येईल यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार राज्यात परवापासून अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व गारपिटीने 17 जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.