
no images were found
किशोरी शहाणे-विज आणि हेमांगी कवी दिसणार नवीन मालिकेत
‘झी टीव्ही’ वाहिनी प्रेक्षकांपुढे एक अशक्य वाटणारी नवी प्रेमकथा घेऊन येत आहे, जिचे नाव आहे ‘कैसे मुझे तुम मिल गये’. यात गुणी अभिनेत्री श्रुती झा ही अमृताची भूमिका साकारणार असून आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता अर्जित तनेजा हा विराटची भूमिका रंगविणार आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुध्द असल्यामुळे जेव्हा ते दोघे एकमेकांना भेटतात, तेव्हा दोन विरोधी विश्वांची होणारी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अमृता ही एक आशावादी आणि रोमॅन्टिक स्वभावाची मराठी मुलगी असते. प्रेमाच्या ताकदीवर आणि अर्थपूर्ण जीवनसाथीच्या पवित्र सहजीवनावर तिचा गाढ विश्वास असतो. तर विराट हा एक जोशीला पंजाबी मुंडा (तरूण) असतो. सर्व मुली या फक्त पैशाच्या मागे असतात, अशी त्याची समजूत झालेली असते आणि म्हणून त्याचा विवाह संस्थेवर विश्वास नसतो. मुक्ता धोंड यांची निर्मिती असलेल्या या मालिकेच्या कथानकाला विविध पदर असून त्यामुळे कथानकाला कधी अकस्मात कलाटणी मिळते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्कंठा वाढत जाते.
नायक-नायिकेच्या आयांच्या भूमिकेतील नामवंत अभिनेत्री किशोरी शहाणे-विज आणि हेमांगी कवी या उत्कंठावर्धक कथानकाला नाट्यमयतेची आणि रंजकतेची जोड देतील. हेमांगी कवी ही भवानी चिटणीसची (अमृताची आई) भूमिका साकारणार आहे. भवानी ही अस्सल मराठमोळी आणि नि:स्वार्थी माता असते. तिचे सारे लक्ष आपल्या कुटुंबाच्या सुखाकडे लागलेले असते. दुसरीकडे किशोरी शहाणे-विज हिची बबिता आहुजा (विराटची आई) ही व्यक्तिरेखा कणखर स्वभावाची पंजाबी आई असून ती दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू भागात राहात असते. तिला तिच्या या उच्चभ्रू सामाजिक स्थानाचा अभिमान असतो. तिला आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करायला आवडत असते. अशा या दोन परस्परविरोधी सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या दोन स्त्रियांची भेट झाल्यावर काय घडेल?
किशोरी शहाणे-विज म्हणाली, “कैसे मुझे तुम मिल गयेमधल्या बबिता आहुजाच्या भूमिकेवर मी बेहद्द खुश आहे. मी एक मराठी महिला या नात्याने असल्याने दुसर््यावर वर्चस्व गाजविणार््या कणखर मनाच्या पंजाबी महिलेची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्या अभिनेत्रीला उत्साहजनक आव्हान आहे. इतक्या गुणी अन्य कलाकारांसमोर मला माझी व्यक्तिरेखा उभी करण्याची संधी मिळत असून त्याची मी प्रतीक्षा करीत आहे. तसंच इतक्या सखोल विचार केलेल्या कथानकाचा एक भाग बनल्यामुळेही मी मनातून कृतज्ञ आहे. माझ्या व्यक्तिरेखेला काही रंजक गुंतागुंत असून माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवील, अशी मी आशा करते.”
हेमांगी कवी म्हणाली, “या सुंदर कथानक असलेल्या मालिकेत मला भवानीची व्यक्तिरेखा रंगविण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. एक मध्यमवर्गीय मराठी स्त्री या नात्याने माझी जी सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यं आहेत, तशाच प्रकारची व्यक्तिरेखा मला इथे साकारण्याची संधी मिळत आहे. आतापर्यंत सर्व कलाकारांबरोबर, विशेषत: श्रुतीबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूपच आनंददायक आहे. आमच्यात माय-लेकींचं खूप छान नातं तयार झालं आहे. आम्ही दोघी एकत्रितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करू. भवानीची व्यक्तिरेखा मी अस्सलपणे आणि आणि प्रौमाणिकपणे साकारीन अशी मला आशा वाटते.”