no images were found
पंचगंगा नदीत झालेल्या मासे मरतुकीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील सर्वात शेवटच्या तेरवाड बंधाऱ्यामध्ये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शिरोळ तालुक्यात मासे मरतुकीची घटना घडत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला मिळाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत तेरवाड बंधारा व आजूबाजुच्या परिसराची दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तात्काळ पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान तेरवाड बंधाऱ्याच्या मासे मरतुकीच्या ठिकाणी प्रथमदर्शनी पिवळसर काळे रंगाचे पाणी दिसून आले व त्यास घरगुती सांडपाण्याचा वास असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांमार्फत इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील ताकवडेवेस पंपींग स्टेशन व महानगरपालिकेच्या हददीतून वाहणाऱ्या नाल्याची पाहणी करण्यात आली.
पाहणी दरम्यान ताकवडे वेस येथील पंपींग स्टेशन बंद स्थितीत होते व तेथून घरगुती सांडपाणी विविध नाल्याव्दारे पंचगंगा नदीमध्ये मिसळताना आढळले. तसेच पाहणी दरम्यान नाल्यावर बसवण्यात आलेली तात्पुरती निर्जंतुकीकरण यंत्रणा चालू नसल्याचे निदर्शनास आले. तसेच म.प्र.नि.मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पृथ:करणासाठी नदीच्या पाण्याचे व नाल्यांच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आलेले असून ते पृथ:करणासाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन इचलकरंजी महानगरपालिकेस प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडून कलम ३३ अ जल (प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण ) कायदा १९७४ अन्वये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्तावित आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच यात सदयस्थितीत बंद असलेली सर्व यंत्रणा तात्काळ चालू करण्यात यावी व पंचगंगा नदीचे प्रदूषण होवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय यांनी कळविले आहे.