Home राजकीय राज ठाकरेंची मनोज जरांगेंना साथ

राज ठाकरेंची मनोज जरांगेंना साथ

2 second read
0
0
75

no images were found

राज ठाकरेंची मनोज जरांगेंना साथ

 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (३१ ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली होती. मात्र मराठा आंदोलकांच्या विनंतीनंतर त्यांनी कालपासून पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. पण अन्नाचा कणही खाणार नाही, शिवाय कसलाही वैद्यकीय उपचार घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. यांनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपला जीव पणाला लावू नका, अशी विनंतीही राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली.
इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तत्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.
तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली या गोष्टींनी यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.
यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का यांनी ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …