no images were found
तर मी आत्ता मोदींना भेटायला जातो – उद्धव ठाकरें
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण चालूच ठेवलं असून त्यामुळे सरकारची पंचाईत झाली आहे. एकीकडे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर न नेण्याची अट असताना दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे. या कचाट्यात राज्य सरकार सापडलेलं असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं आहे. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील व समाजातील इतर व्यक्तींनी टोकाचं पाऊल उचलू नये, अशी विनंती केली आहे. “जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला आणि समाजाला गरज आहे. मराठा समाजातल्या तरुणांनाही मी विनंती करतो की कृपा करून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व खासदारानी राजीनामे द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. “मराठा आरक्षणाची स्थिती हाताबाहेर जायला लागली आहे. आपापसांत वाद घालून काही होणार नाही. काही खासदार राजीनामे देत आहेत, काही द्यायच्या प्रयत्नात आहेत. पण काही खासदारांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. यासाठी मी सांगतोय की जेव्हा केव्हा केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होईल, तेव्हा पंतप्रधानांना सांगा की ‘आजपर्यंत आम्ही तुमचं सगळं ऐकलं. आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. तुम्ही त्यावर काही निर्णय घेणार आहात का? घेणार असाल तर लवकर घ्या, नसेल तर आम्ही तुमच्याबरोबर नाही राहू शकत’. एवढी हिंमत तर त्यांच्यामध्ये असली पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी लागलीच त्यासाठी तयारी दर्शवली. “या विषयासाठी पंतप्रधानांना भेटायला मला काहीच अडचण नाही. पण मी मुख्यमंत्री असताना जे विषय मांडले होते, त्याची दखल घेतली नाही. आता मी बोलल्यावर ते ऐकणार असतील तर आत्ता तुमच्यासमोर मी पंतप्रधानांना भेटायला जायला तयार आहे. पण जे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांच्यातल्या नाराजीनाट्यासाठी, मंत्रीमंडळ विस्तारासाठी दिल्लीत जातात, आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एकदा तरी ते दिल्लीत गेलेत का आत्तापर्यंत? का नाही गेले? सगळे समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अस्वस्थ आहेत. त्यांची रिकामी पोटं भरण्याची जबाबदारी कुणाची आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
इथे येऊ घातलेले उद्योगधंदे त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये नेले. मुंबईचंही महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. असं वातावरण चिघळलं तर उद्योगधंदे इथे येणारच नाहीत. त्यांचं तर काम होतंय”, असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.