
no images were found
तनिषा मेहता म्हणते, “मला आणखी स्टंट प्रसंग साकारण्याची इच्छा आहे!”
‘झी टीव्ही’वरील आगामी ‘इक कुडी पंजाब दी’ ही एक नाट्यपूर्ण कथानक असलेली मालिका असून सशक्त कथानक आणि सुस्पष्ट रेखाटलेल्या व्यक्तिरेखांमुळे ती प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवील. ‘डोम एंटरटेन्मेंट’ संस्थेची निर्मिती असलेल्या या मालिकेचे कथानक अकस्मात येणार््या कलाटण्यांनी उत्कंठावर्धक बनेल. पंजाबमधील कपूरथला या माजी संस्थानात मालिकेचे कथानक घडते. जाट जमीनदार घराण्यात जन्मलेल्या हीर ग्रेवाल (तनिशा मेहता) या तरूण, सुंदर आणि उत्साही तरुणीच्या जीवनाची कथा यात सादर करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबियांना सुखी ठेवणे, ही आपली प्रमुख जबाबदारी आहे, असे हीरला वाटते. पण अटवाल कुटुंबात लग्न केल्यानंतर तिच्या जीवनाला एकदम अशी कलाटणी मिळते की सर्वजणांना एकच प्रश्न पडतो, “जिसने माँगी सबकी खैर… वक्त ने किया… क्यूं उससे बैर?”
आपली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रत्येक कलाकाराला पूर्वतयारी करावी लागते. या मालिकेच्या एका प्रोमोसाठी हातात बंदूक कशी पकडायची, ते तनिशा मेहताला शिकावे लागले. हातात बंदूक पकडल्यावर कसे उभे राहायचे आणि कसे संवाद म्हणायचे, त्याचे प्रशिक्षणही एका व्यावसायिकाकडून तिने घेतले. बंदूक तशी वजनदार असल्याने तनिशाला ती सांभाळणे सोपे नव्हते. पण बरेच तास सराव केल्यानंतर तिने हा प्रसंग अगदी सहजपणे आणि निर्दोष पध्दतीने साकारला. या प्रसंगासाठी बंदूक चालवताना तिला मजा आली. तिच्या या नव्या अवताराबद्दल सोशल मीडियावर तिला अनेक प्रेक्षक आणि चाहत्यांकडून प्रशंसा मिळाली.
तनिशा मेहता म्हणाली, “माझे चाहते आणि प्रेक्षकांनी माझ्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला जेव्हा वाटतं की मी यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हा प्रसंग करू शकते, तेव्हा ती गोष्ट मी सोशल मीडियावर प्रसृत करते. म्हणूनच मी प्रत्येक प्रसंगात माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न करते, त्यामागे हेच एक प्रमुख कारण आहे. या प्रोमोसाठी बंदूक चालवण्याचा प्रसंग साकारणं माझ्यासाठी थोडं अवघड होतं कारण ती बंदूक खूप जड होती. पण सेटवरील प्रत्येकाने मला हा प्रसंग कसा साकारायचा, त्यासाठी मदत केली. प्रसंग अस्सल वाटण्यासाठी बंदूक प्रत्यक्षात कशी पकडायची असते, ते मला व्यावसायिक व्यक्तीने शिकविलं, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रोमोमध्ये हा केवळ काही सेकंदांचा प्रसंग असला, तरी तो अचूकपणे साकारण्यासाठी मला त्याचा वारंवार सराव करावा लागला. अशा प्रकारचा प्रसंग मी प्रथमच चित्रीकरण केलं असून मालिकेत अशा प्रकारचे आणखी स्टंट प्रसंग साकारण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे.”
तनिशा मेहताला अशा धडाकेबाज अवतारात पाहून प्रेक्षकांमध्ये थरार निर्माण होईल, पण जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी रांझा (अविनेश रेखी) तिला कशी मदत करेल, हे पाहणे खूपच रंजक ठरेल.