no images were found
विद्यापीठात ‘अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहा’चे उद्घाटन
कोल्हापूर(प्रतीनिधी): शिवाजी विद्यापीठाचे अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृह हे आईवडिलांचे आपल्या दिवंगत मुलीप्रती प्रेमाचे आणि ज्ञानाप्रती आस्थेचे चिरंतन प्रतीक म्हणून ओळखले जाईल, अशी भावपूर्ण अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे माजी सहाय्यक कुलसचिव पंडित सदाशिव मारुलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रजनी मारुलकर यांनी त्यांची दिवंगत कन्या अस्मिता हिच्या स्मरणार्थ विद्यापीठास दिलेल्या ३५ लाख रुपयांच्या निधीमधून विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अस्मिता मारुलकर हिच्या स्मृतींचा गहिवर तिच्या आईवडिलांसह या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनी दाटलेला होता. त्यामुळे मारुलकर कुटुंबियांच्या सत्पात्री दानातून साकार झालेला हा उद्घाटन समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वसतिगृहाच्या रुपाने अस्मिताचे भव्य आणि चिरंतन स्मारक विद्यापीठात उभे राहिल्याचे समाधान मारुलकर दांपत्याच्या मनी दाटून आले. एका डोळ्यांत तिच्या आठवणींचे आसू, अन् दुसऱ्यात समाधानाचे हसू अशी त्यांची अवस्था झाली होती.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मारुलकर दांपत्याने शिवाजी विद्यापीठास दिलेला ३५ लाखांचा निधी हा आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने व्यक्तीगत पातळीवर दिलेला सर्वाधिक निधी आहे. यातून त्यांनी विद्यापीठाशी चिरंतन नाते जोडले आहे. या त्यांच्या दातृत्वातून केवळ हे एकच वसतिगृह साकार झाले आहे, असे नाही; तर यातूनच लोकवर्गणीतून विद्यार्थिनींसाठी ‘लोकस्मृती वसतिगृह’ निर्माण करण्याची संकल्पना साकार झाली असून त्या दृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी डॉ. भारती पाटील यांनी संशोधक विद्यार्थिनींच्या गरजा लक्षात घेऊन या वसतिगृहाची विचारपूर्वक उभारणी केल्याचे लक्षात येते, असे सांगितले. यावेळी पंडित मारुलकर यांनी अस्मिता हिच्या स्मृतींना उजाळा दिला आणि विद्यापीठाने सव्वा वर्षाच्या विक्रमी कालावधीत या वसतिगृहाची देखणी इमारत उभी केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ प्रशासनास धन्यवाद दिले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.