no images were found
‘कुमकुम भाग्य’चा काळ 20 वर्षांनी पुढे नेणार; प्रमुख भूमिकांसाठी अब्रार काझी आणि राची शर्मा यांची निवड!
उत्कंठावर्धक आणि मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि नाट्यपूर्ण घटनांनी झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभी आणि प्रज्ञाच्या अध्यायाच्या धक्कादायक अंतानंतर मालिकेच्या कथानकाला अनेक कलाटण्या मिळाल्या आणि रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चापेकर) यांच्या जीवनात उलथापालथ होऊन ते विभक्त झाले. आता ते पुन्हा कधी एकत्र येतील, ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक बनले आहेत. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मालिकेच्या कथानकात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे असून कथानकाचा काळ तब्बल 20 वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. त्यानंतर मालिकेत प्राचीची मुलगी पूर्वीच्या जीवनाची कहाणी सादर केली जाईल.
पहिल्याच भेटीत पूर्वी आणि राजवंश मल्होत्रा हे प्रेमात पडतात आणि येथून नव्या कथानकाचा प्रारंभ होतो. मात्र त्यांच्या लग्नाच्या दिवशी आपल्या मनासारखा जोडीदार मिळाल्याने पूर्वी दाम्पत्य जीवनाची शपथ घेताना दिसली, तरी राजवंशचे मात्र लग्नविधींमध्ये लक्ष नसल्याचे दिसते. परिणामी सर्वांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, “प्यार के लिये पत्नी खा रहीं है कसमें, फिर क्यों पती निभा रहा है अधूरी रस्मे?”
मालिकेच्या कथानकाचा काळ पुढे नेल्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री राची शर्मा ही पूर्वीची व्यक्तिरेखा साकार करणार आहे. पूर्वी ही शाळेत शिक्षिका असते. ती एक साधे जीवन व्यतीत करीत असते. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतून ती आनंद घेते आणि येणार््या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करते. ती फार महत्त्वाकांक्षी मुलगी नसते. दुसरीकडे नामवंत अभिनेता अब्रार काझी हा राजवंश मल्होत्राची भूमिका उभी करणार असून तो एक महत्त्वाकांक्षी उद्योगपती असतो. तो तसा आनंदी स्वभावाचा असतो. उद्योगाच्या विश्वात तो कणखर आणि निश्चयी म्हणून ओळखला जात असला, तरी आपल्या कुटुंबियांशी तो एकनिष्ठ असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक बाजू असतात.
राची शर्मा म्हणाली, “मला जेव्हा समजलं की गेली नऊ वर्षं अतिशय लोकप्रिय राहिलेल्या या मालिकेत प्रमुख भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे, तेव्हा मी आनंदाने थरारून गेले. मालिकेतील सर्व कलाकार आणि त्यांची टीम ही खूपच अगत्यशील असून सेटवरील माझा अनुभव खूपच आनंददायक राहिला आहे. आता 20 वर्षांनी काळ पुढे नेल्यानंतर प्रेक्षक नव्या कथानकाचा आनंद घेतील, अशी मी आशा करते.”
अब्रार काझी म्हणाला, “एकता मॅमबरोबर ही माझी दुसरी मालिका असून या टीमबरोबर काम करण्यास मी उत्सुक झालो आहे. यातील माझी व्यक्तिरेखा खूपच रंजक आहे. त्याच्या प्रोमोसाठी चित्रीकरण करताना मला खूप मजा आली. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेच्या नव्या कथानकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण होईल, याची मला खात्री आहे. प्रेक्षक आता पूर्वी आणि राजवंश यांच्याही प्रेमात पडतील, अशी मी आशा करतो. मालिकेचं कथानक प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्कंठा कायम राखेल.”20 वर्षांनंतर रणबीर आणि प्राची यांचे काय होईल, तसेच पूर्वी आणि राजवंश यांची प्रेमकथा कशी उलगडत जाईल, ते पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.