no images were found
लोकसभेच्या 22 जागांवर शिंदेंचा दावा, जागा सोडण्याची भाजपचीही तयारी, पण अजित पवार गटाची भूमिका काय?
शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी थेट 22 जागांवर दावा करण्यात आल्यामुळे महायुतीमधील जागावाटप अर्थातच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आणि अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत अजित पवार गटाची भूमिका काय असणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर यासंदर्भात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट एकत्र चर्चा करुन मार्ग काढेल, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या 22 जागांवरचा दावा कायम आहे. तसेच, समर्थक तेरा खासदारांच्या जागांवर पुन्हा लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत सर्व 22 जागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्यांची नेमणूक करून त्यांना जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याला एक किंवा दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याचंही राहुल शेवाळेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यमान खासदारांची जागा सोडणार नाही, हेदेखील राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत बोलताना सांगितलं की, “गेल्या लोकसभेत शिवसेनेनं ज्या 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या 22 जागांपैकी तटकरेंची जागा आहे, त्याठिकाणी गितेंनी निवडणूक लढवली होती. त्यासंदर्बातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र निर्णय घेतील. आढळराव पाटलांनी निवडणूक लढवली होती, त्यासंदर्भातील निर्णयही चर्चेतून घेतला जाईल. 13 खासदारांबाबतचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. कारण ते 13 खासदार आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत.”