no images were found
भाजपाकडून मुस्लीम समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न !
मुस्लीम समुदायाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपाकडून गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील पसमंदा मुस्लीम यांना जवळ करण्याचा प्रयत्न याआधी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर आता भाजपाकडून सुफी संवाद महा अभियान राबविले जात आहे, या माध्यमातून सुभी संप्रदायाशी संवाद साधला जाणार आहे. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा विभागाने १२ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे आयोजित केलेल्या सुफी संवाद महा अभियानासाठी १०० हून अधिक दर्ग्यातील २०० सुफी उपस्थित होते. मोदी सरकारची धोरणे आणि मुस्लिमांसाठी आखलेल्या योजना देशभरात घेऊन जाव्यात, असे आवाहन सदर अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले.
सुफींच्या माध्यमातून मुस्लीमाना एकत्र आणण्याचे प्रयत्न
“भारतीय संस्कृतीमध्ये सुफी संप्रदायास विशेष महत्त्व असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुफी संप्रदायाचे कौतुक केले होते. सुफी सामान्य माणसांमध्ये वावरतात आणि धर्म, जात, पंथ आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. भाजपा सरकारची धोरणे आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी देशभरातील सुफी संप्रदायाला एकत्र करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. सुफी कार्यक्रम हा पसमंदा मुस्लीम समुदायापेक्षा वेगळा असणार आहे. सुफी अध्यात्मिक गुरुंच्या माध्यमातून भाजपा मुस्लीम समुदायातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.