
no images were found
शिवाजी विद्यापीठात क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी ): शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिभागामार्फत तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण व AIU खेळाडू पात्रता नियमावली या विषयावर शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील क्रीडा शारीरिक संचालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा बुधवारी (दि. २७) यशस्वीरित्या संपन्न झाली.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्ष स्थानी उपस्थित होते त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये खेळाडूंना सर्व सुविधानियुक्त तंत्रशुद्ध प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार आहे व विद्यापीठाच्या खेळाडूंना व सर्व शारीरिक शिक्षण संचालक यांचे मागील वर्षी प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले व चालू वर्षाच्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री महेंद्र गोखले यांनी विविध क्रीडा प्रशिक्षणामध्ये वयोगटानुसार कसे क्रीडा प्रशिक्षण द्यायला हवे आणि प्रशिक्षकाने प्रशिक्षण देत असताना खेळाडूची मानसिकता, शारीरिक तंदुरुस्ती आणि आहार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात अमरावती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी Association of Indian Universities द्वारा दिले गेलेल्या स्पर्धेसाठी पात्रता या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. प्रा. विजय रोकडे व डॉ. लीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ एन डी पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ एन आर कांबळे, प्रा. किरण पाटील, प्रा. डॉ सुरेश फराकटे, प्रा. सुचय खोपडे, पृथ्वीराज सरनाईक यांनी संयोजन केले.