no images were found
राजपत्रित अधिकारी महासंघाकडून कोल्हापूर येथे निषेध दिनाचे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी ) : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियमबाहय कामे करुन घेण्यासाठी दबाव निर्माण करण्याच्या समाजकंटकांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत भा.द.वि. कलम 353 च्या संरक्षणात्मक तरतूदीमध्ये बदल करण्याची शासनाची कार्यवाही पूर्णत : एकतर्फी व शासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल
खच्चीकरण करणारे आहे. यामुळे मारहाण दमबाजी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकरी संजय तेली यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी संजय तेली, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी भुसंपादन शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ व तहसिलदार तसेच नायब तहसिलदार उपस्थिती होते.
राजपत्रित अधिकारी महासंघाने वारंवार विनंती करुन देखील भा.द.वि. कलम मधील संरक्षणात्मक तरतुदी निष्प्रभ केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शासनाच्या या एकतर्फी कार्यवाहीचा निषेध व मारहाण दमबाजी सारख्या वाढत्या प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राजपत्रित अधिकारी
महासंघाच्या निर्णयानुसार राजव्यापी निषेध दिन पाळण्यात येत आहे. तसेच कलम 353 च्या संरक्षणात्मक तरतुदी पूर्ववत न केल्यास सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.