no images were found
‘शॉर्ट अँड स्वीट’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
महाराष्ट्र : गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची कथा संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली असून या पहिल्या पोस्टरमध्ये ही बाब अत्यंत ठळकपणे अधोरेखित होते. या पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हे कलाकार दिसत आहेत. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ नेतो असे या पोस्टरमध्ये दिसते. या दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा चित्रपट रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरु झाली आहे.
चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलताना दिग्दर्शक गणेश कदम म्हणाले, “आज प्रदर्शित करण्यात आलेले पोस्टर हा चित्रपटाचा एकप्रकारे आरसा आहे. त्यातून चित्रपटाचा बाज समोर येतो. त्याचा दर्जा, रंजकता, कलाकारांची देहबोली या गोष्टी त्यातून समोर येतात. त्यामुळे अर्थातच चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढेल.”
‘शॉर्ट अँड स्वीट’ ही एक संपूर्णतः कौटुंबिक कथा आहे. ही कथा एका अनपेक्षित आणि अनोख्या अशा कौटुंबिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ओमकार भोजने, रसिका सुनील, तुषार खैर, अजित भुरे आदींच्याही प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाचे सादरीकरण शुभम प्रॉडक्शनचे असून निर्मिती पायल गणेश कदम आणि विनोद राव यांची आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.
‘शॉर्ट अँड स्वीट’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वप्नील बारस्कर यांचे असून संगीत संतोष मुळेकर यांनी दिले आहे. राहुल जनार्दन जाधव हे छायाचित्रण दिग्दर्शक आहेत. मंगेश कांगणे यांनी यातील गाणी लिहिली असून सुर्यकांत मगदूम यांनी ध्वनी इफेक्टची जबाबदारी सांभाळली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक गणेश कदम म्हणाले, “शॉर्ट अँड स्वीट’ हा स्वीकारार्हतेचा मार्ग अवलंबतो. तिथे सर्वसाधारण आणि आगळे वेगळे लोक हे खुल्या दिलाने एकत्र येतात. या कथेची खरी गम्मत ही या चित्रपटाची दृश्ये किंवा त्यातील अदाकारीवर नाही तर समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांना एकत्र करण्याच्या क्षमतेमध्ये सामावली आहे. परिपूर्णता ही उणीवांचा स्वीकार करण्याच्या पुलावर बेतलेली असते. हा असा चित्रपट आहे जो विवाद हे स्वीकारार्हतेमध्ये बदलतात. इथे सर्वसाधारण व अनोख्या गोष्टी हातात हात घालून चालतात.”