no images were found
शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी बँकर्ससाठी कार्यशाळांचे आयोजन – राहुल रेखावार
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये विविध शासन पुरस्कृत योजना बँकेद्वारे राबविल्या जातात. शासन पुरस्कृत योजनांची संपूर्ण माहिती होण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील बँकर्ससाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली कार्यशाळा बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर येथे हातकणंगले तालुक्यातील बँकर्ससाठी होणार आहे. या कार्यशाळेमुळे विविध योजनांची जनजागृती होवून जिल्ह्यामध्ये शेती, शेती पूरक व इतर व्यवसाय वाढीसाठी उपयोग होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यशाळेत विविध विकास महामंडळाच्या योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), AIF (कृषी पायाभूत सुविधा निधी), बचत गटासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) व महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (RSETI), स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) इत्यादी योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेसाठी संबधित विभागाचे विभाग प्रमुख बँकर्सना मार्गदर्शन करणार आहेत.