
no images were found
नितीमूल्यांच्या प्रामाणिक जोपासनेला ‘इस्रो’चे सर्वोच्च प्राधान्य
कोल्हापूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सदैव नितीमूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. नितीमूल्यांच्या प्रामाणिक जोपासनेमुळेच आजवरचे यश प्राप्त करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन इस्रोचे उपसंचालक डॉ. एस.व्ही. शर्मा यांनी आज येथे केले.
इस्रोने अलीकडेच ‘चांद्रयान-३’ आणि ‘आदित्य एल-१’ या दोन मोहिमांतर्गत उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने इस्रोचे उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा आणि वरिष्ठ अभियंता डॉ. आर श्रीविद्या यांना ‘मीट द सायंटिस्ट’ उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
डॉ. शर्मा यांनी “भारतातील अवकाश संशोधनाची उत्क्रांती” या विषयावर, तर डॉ. श्रीविद्या यांनी “चांद्रयान, आदित्य आणि भारताचे उपग्रह प्रकल्प” या विषयांवर व्याख्याने दिली.
डॉ. शर्मा म्हणाले, अथक व सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, निर्धार आणि समर्पण या बाबी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असतात. यशाला कोणताही शॉर्टकट असत नाही. इस्रोमध्ये हीच संस्कृती रुजलेली आहे. कोणतेही काम या मूल्यांच्या प्रामाणिक जोपासनेमुळे तडीस नेणे शक्य होते. त्याचप्रमाणे इस्रोमधील प्रत्येकाचा स्वतःवर विश्वास आहे. हा आत्मविश्वासच आम्हाला सातत्याने चांगल्या कामासाठी प्रेरित करतो. हार मानणे आम्हाला मंजूर नाही. मागील चुका टाळून नव्याने कामाला लागून ते यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबत नाही. म्हणूनच भारतीयांचा इस्रोवर प्रचंड विश्वास आहे. या विश्वास व प्रेमामुळेच सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. इस्रोही या विश्वासाला जागून देशबांधवांच्या पै न पैचा विचार करून जास्तीत जास्त बचत करीत आपल्या अवकाश संशोधन मोहिमा यशस्वी करीत आली आहे. मंगळ मोहीम आम्ही हॉलिवूड चित्रपटाच्या खर्चापेक्षाही कमी खर्चात पूर्ण केली. शिवाय, ५० कोटी रुपये आम्ही वाचवू शकलो.
इस्रोमध्ये आम्ही सारे शास्त्रज्ञ आहोत, येथे आमच्यात जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा आदी कोणताही परस्परभेद नाही, ही आपली संस्कृती असल्याचे सांगून डॉ. शर्मा म्हणाले, आपली संस्कृती, आपले तंत्रज्ञान यांवर आमचा विश्वास आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी आग्रही असायला हवे. आपण जगभरात चाललेल्या घटना-घडामोडींबाबत सजग असायला हवे. पण कोणाच्याही मागे जाऊ नये. मात्र, सर्वांकडून शिकत राहायला हवे. आपण विचार करणे विसरत चाललो आहोत. विचार करू या. प्रश्न विचारू या. त्यातून आपण ज्ञानवृद्धीच्या दिशेने जात राहतो. हाच मार्ग आपल्याला यशाकडे घेऊन जाईल.
यावेळी इस्रोच्या वरिष्ठ अभियंता डॉ. आर. श्रीविद्या यांनी इस्रोच्या विविध अवकाश मोहिमांसह चांद्रयान व आदित्य या मोहिमांची वैशिष्ट्ये सांगितली. भारताच्या अवकाश संशोधन मोहिमांचे वेगळेपण त्यांनी अत्यंत तपशीलवारपणे समजावून सांगितले. यावेळी दोन्ही शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे सुमारे तासभराहून अधिक काळ समाधान केले.
यावेळी डॉ. राजीव व्हटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. केशव राजपुरे पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नीलेश तरवाळ यांनी आभार मानले. या व्याख्यानासाठी विद्यापीठातील विविध अधिविभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात डॉ. शर्मा यांनी विद्यापीठातील सेवा-सुविधा केंद्रे आणि अधिविभागांना भेटी दिल्या. संध्याकाळी विद्यापीठातील अधिविभाग प्रमुख आणि शिक्षकांसोबत “राष्ट्र निर्माण आणि शैक्षणिक संस्थेची भूमिका” या विषयावर संवाद साधला. या कार्यक्रमाचे समन्वयन पदार्थविज्ञान अधिविभागामार्फत करण्यात आले.