
no images were found
विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. मोरे
कोल्हापूर : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी.के. मोरे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. यावेळी उपकुलसचिव डॉ.एन.जे.बनसोडे, सी.ए. कोतमिरे, समन्वयक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाने दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या सर्व बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) आणि एम.बी.ए. अशा एकूण बारा अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. त्यामुळे याचा फायदा विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, शेतकरी, उद्योजक, सैनिक, बंदीजन यांच्याबरोबरच नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच वेळी पदविका आणि पदवी, अथवा दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होता येणार आहे, असा निर्णय घेतला आहे. ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे. यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही निवड करता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगानुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर असणार नाही, अशी माहितीही डॉ. मोरे यांनी दिली.
दुहेरी पदवीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून शिकू शकतो. एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्ग उपस्थिती आणि दुसरा अभ्यासक्रम मुक्त (ओपन) किंवा दूरशिक्षणातील अथवा ऑनलाईन स्वरुपातीलही असू शकतो. तसेच दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईनही असू शकतात. किंवा दोन्ही मुक्त वा दूरशिक्षण पद्धतीतीलही असू शकतात. त्यामुळे या संधीचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन डॉ.मोरे यांनी केले.