no images were found
तैवानच्या नॅशनल डोंग ह्वा विद्यापीठाचे डॉ. प्रमोद पाटील मानद युनिव्हर्सिटी चेअर प्रोफेसर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची तैवान येथील नॅशनल डोंग ह्वा विद्यापीठाच्या मानद युनिव्हर्सिटी चेअर प्रोफेसरपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड एक वर्षासाठी असून विद्यापीठाचे अध्यक्ष हान चिह चाओ यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील हे सेमीकंडक्टर डिव्हाईसेस तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने तेथील संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे मटेरियल सायन्स आणि तदअनुषंगिक विषयांवर व्याख्याने देणे, तैवान विद्यापीठातील भौतिकशास्त्र व मटेरियल सायन्स विभागातील प्राध्यापकांशी चर्चा, नवीन संकल्पनांच्या आधारावर संयुक्त संशोधन प्रकल्प सादरीकरण, शोधनिबंधांचे प्रकाशन, पेटंट सादरीकरण इत्यादी संयुक्त संशोधनकार्ये करणे अभिप्रेत आहे. शिवाजी विद्यापीठ व नॅशनल डोंग ह्वा विद्यापीठामध्ये संशोधन साहचर्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची संधी आहे.
या निवडीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा एक संशोधक-प्राध्यापक म्हणून अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची मानद संधी मिळणे हा माझा बहुमान आहे. या संधीचा लाभ विद्यापीठातील मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी निश्चितपणे करेन. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे मानांकन उंचावण्यासाठीही ही संधी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांना मिळालेल्या या महत्त्वपूर्ण संधीबद्दल कुलपती रमेश बैस आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.